नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – खासदार शशी थरूर हे काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार आहेत. तत्पूर्वी थरुर यांनी सोनिया गांधी यांची आज भेट घेतली. सोनियांनी त्यांना स्पष्ट केले आहे की, यंदा खऱ्या अर्थाने निवडणूक होईल. अध्यक्षपदासाठी ज्याला निवडणूक लढवायची असेल तर तो रिंगणात उतरू शकतो. एवढेच नाही तर या काळात संपूर्ण पारदर्शकता आणि निष्पक्षता राखली जाईल, असेही काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षांनी स्पष्ट केले. यानंतर थरूर काँग्रेस अध्यक्षपदाच्या शर्यतीत उतरण्याच्या तयारीत असल्याचे मानले जात आहे.
काही दिवसांपूर्वी थरूर यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीतील पारदर्शकता आणि निष्पक्षतेवर प्रश्न उपस्थित केले होते. काँग्रेसच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शशी थरूर यांच्यासोबत झालेल्या भेटीदरम्यान सोनिया गांधी यांनी त्यांना आश्वासन दिले आहे की, निवडणुका पूर्णपणे पारदर्शक आणि निष्पक्ष होतील. सोनियांकडून आश्वासन मिळाल्यानंतर थरूर काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवण्याच्या तयारीत असल्याचे मानले जात आहे. थरूर यांची बाजू जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. यापूर्वी काँग्रेसने म्हटले होते की, पक्षाध्यक्षपदासाठी कोणीही दावा करू शकतो. मात्र, यासाठी किमान १० प्रतिनिधींचा पाठिंबा लागेल.
विशेष म्हणजे, यापूर्वी काँग्रेसच्या अनेक खासदारांनी अध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया पारदर्शक ठेवण्याची मागणी केली होती. या संदर्भात काँग्रेसच्या पाच खासदारांनी काँग्रेसच्या अंतर्गत निवडणूक पॅनलचे प्रमुख मधुसूदन मिस्त्री यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक लढविण्यास सक्षम असलेल्या सर्व मतदार आणि उमेदवारांना पीसीसी प्रतिनिधींची यादी देण्याची मागणी करण्यात आली होती. ६ सप्टेंबर रोजी हे संयुक्त पत्र लोकसभा खासदार शशी थरूर, मनीष तिवारी, कार्ती चिदंबरम, प्रद्युत बोर्दोलोई आणि अब्दुल खलेक यांनी लिहिले होते. ही यादी उपलब्ध करून द्यावी, जेणेकरून उमेदवार नेमण्याचा आणि मतदान करण्याचा अधिकार कोणाला आहे, हे स्पष्ट होईल, असे सांगण्यात आले.
Politics Congress President Election Shashi Tharoor