मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सध्या महाराष्ट्राचा राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे अनेक पक्षांमध्ये अस्वस्थता दिसत असून आगामी काळात आपला पक्ष बलवान कसा होईल याकडे सर्वच पक्षातील वरिष्ठ नेते कामाला लागले आहेत. एकीकडे शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप सत्तेत आल्यापासून जनतेचा कल आपल्याकडे कसा राहील यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न करत आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडी मधील घटक पक्ष म्हणजेच शिवसेना (उद्धव ठाकरे गट ), राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यामध्ये देखील एकजुटीची वज्रमूट असल्याचा भास निर्माण केला जात आहे. प्रत्यक्षात मात्र त्यांच्यामध्येच अंतर्गत रस्सीखेच सुरू आहे, हे वारंवार उघड झाले आहे. आता पुन्हा एकदा कोकणातील महाड येथील सभेवरून काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव ठाकरे गट ) यांच्यामध्ये वितुष्ट निर्माण झाले आहे, याला कारण म्हणजे उद्धव ठाकरे यांनी संपूर्ण महाराष्ट्रात सभा घेण्याचा धडाका लावला असून जनतेची सहानुभूती आपल्याकडे मिळवण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत.
महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेस आणि ठाकरे गटात पुन्हा एकदा वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत. अलीकडेच महाड इथं उद्धव ठाकरेंची सभा झाली. त्यात सभेत काँग्रेसच्या स्नेहल जगताप यांनी ठाकरे गटात प्रवेश केला. स्नेहल जगताप या माजी आमदार माणिकराव जगताप यांच्या कन्या आहेत.माणिकराव जगताप यांचे मागील वर्षीच निधन झाले. स्नेहल जगताप यांनी महाडचे नगराध्यक्षपदही सांभाळले आहे. अनेक वर्ष काँग्रेस पक्षासोबत असलेल्या स्नेहल जगताप यांनी काही महिन्यांपूर्वी उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती. त्यांना महाड मधून विधानसभेची निवडणूक लढवायची आहे.
महाड येथील ठाकरेंच्या सभेत त्यांचा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. तसेच स्नेहल जगताप यांच्यासोबत हनुमंत जगताप, संदीप जाधव, राजेंद्र कोरपे, धनंजय देशमुख, श्रीधर सकपाळ या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ही ठाकरे गटात प्रवेश घेतल्याने काँग्रेसला धक्का बसला. त्यामुळे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरे यांना सांगूनही त्यांनी ऐकले नाही, असे म्हणत पटोलेंनी नाराजी व्यक्त केली.
महाविकास आघाडीची बैठक होईल तेव्हा याविषयावर चर्चा करू. महाडची ती जागा काँग्रेस पक्षच लढवेल असेही पटोलेंनी स्पष्ट सांगितले आहे. त्यामुळे आता महाडच्या जागेवरून ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यात तिढा निर्माण होण्याची शक्यता आहे. सध्या महाड येथे आमदार भरत गोगावले मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असून ते शिंदे गटात आहेत.
https://twitter.com/ShivSenaUBT_/status/1654882566888099841?s=20
Politics Congress Nana Patole on Uddhav Thackeray Mahad Tour