मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी अदानी प्रकरणावर पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. आज मुंबईत आलेल्या राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेत मोदींना थेट प्रश्न विचारले. हिंडेनबर्ग नंतर आणखी एका आंतरराष्ट्रीय संस्थेने अदानींच्या गैरव्यवहारासंदर्भात अहवाल जाहीर केला आहे. त्यामुळे यापुढील काळात पुन्हा अदानी प्रकरण तापणार असल्याचे स्पष्ट होत आहे.
काँग्रेस खासदार सोनिया गांधी आणि राहुल गांधी विरोधी पक्ष आघाडी इंडियन नॅशनल डेव्हलपमेंट इनक्लुसिव्ह अलायन्स (इंडिया) च्या तिसऱ्या बैठकीत सहभागी होण्यासाठी मुंबईत दाखल झाले. त्यांच्या स्वागतासाठी मुंबई विमानतळाबाहेर काँग्रेस समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. बैठकीपूर्वी राहुल यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी अदानी प्रकरणावर बोलताना कंपनीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले. त्यांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही घेरले.
राहुल गांधी म्हणाले की, सध्या जी-२० चे वातावरण आहे. भारतासाठी आर्थिक वातावरण आणि व्यवसाय क्षेत्रात सर्वांसाठी समान संधी आणि पारदर्शकता असणे आवश्यक आहे. एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न आजच्या वर्तमानपत्रात विचारण्यात आला आहे. द गार्डियन आणि फायनान्शिअल टाईम्स या जगातील वृत्तपत्रांमध्ये गौतम अदानीबद्दल बातमी प्रसिद्ध झाली आहे की, अदानी कुटुंबातील एका व्यक्तीने परदेशी फंडातून स्वतःच्या स्टॉकमध्ये गुंतवणूक केली आहे. अदानी समुहातील कंपन्यांच्या नेटवर्कद्वारे एक अब्ज डॉलर्सचा पैसा भारताबाहेर गेला आणि वेगवेगळ्या देशांमध्ये फिरून परत आला. त्यामुळे अदानी समूहाच्या समभागांची किंमत वाढली. हा पैसा बंदरे आणि विमानतळांसारख्या भारतीय मालमत्ता मिळविण्यासाठी वापरला गेला.
राहुल गांधी म्हणाले की, पहिला प्रश्न पडतो तो पैसा कोणाचा? ते अदानीजींचे आहे की दुसर्याचे? ते दुसऱ्याची असतील तर कुणाचे? दुसरा प्रश्न असा की यामागचा सूत्रधार कोण? विनोद अदानी आहे का? नासिर अली आणि चीनचे चेंग चुंग लियांग या दोन परदेशी नागरिकांचाही यात समावेश आहे. हे विदेशी नागरिक भारताचा शेअर बाजार कसा चालवत आहेत? चीनच्या नागरिकाची भूमिका काय आहे? तिसरा प्रश्न असा आहे की या प्रकरणाचा तपास करून क्लीन चिट देणारे सेबी (SEBI) चेअरमन नंतर अदानी जींच्या कंपनीत डायरेक्टर कसे झाले?
राहुल म्हणाले की, भारताची प्रतिमा धोक्यात आली आहे. यासंदर्भात संयुक्त संसदीय समिती स्थापन करून सखोल चौकशी करण्याची गरज आहे. येथे जी२० चे पाहुणे येत आहेत आणि येथे आल्यानंतर ते विचारू शकतात की ही खास कंपनी कोणती आहे, जी पंतप्रधानांच्या जवळचे लोक चालवतात. त्यांना असा मोकळा हात कसा दिला जात आहे? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे
Politics Congress MP Rahul Gandhi Questions Adani Group PM Modi