मुंबई – काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर पाळत ठेवल्याचा आरोप केल्यानंतर काँग्रेसच्या तीन नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. पवार यांचे निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओक येथे झालेल्या या भेटीत महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण आणि काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील हे उपस्थित होते. ही सदिच्छा भेट असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने सांगण्यात आले आहे. या भेटीत काय चर्चा समोर आली नसली तरी महाविकास आघाडी सरकारमधील मतभेदांबाबत चर्चा झाल्याचे समजते. पटोले यांच्या विधानानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली होती. तसेच, विरोधकांनीही याप्रकरणी टीका केली आहे. महाविकास आघाडी सरकारमधील मतभेद असणे हे योग्य नाही. तिन्ही पक्ष एकसंध आणि एक विचाराचे असून त्याद्वारे राज्याच्या विकासाची वाटचाल सुरू असल्याचा संदेश सर्वसामान्यांमध्ये जाणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने भेटीत चर्चा झाल्याचे समजते.
राज्याचे महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. अशोक चव्हाण आणि काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील यांनी आज आदरणीय खा. शरद पवार साहेबांची त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली.@PawarSpeaks @bb_thorat @AshokChavanINC @HKPatil1953 pic.twitter.com/PuKQlmfvFZ
— NCP (@NCPspeaks) July 13, 2021