नवी दिल्ली – देशातील पाच राज्यांमध्ये पुढील वर्षी विधानसभेच्या निवडणुका होणार असून यासाठी सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली आहे. त्यामुळे पक्षांतर्गत रणनीती तयार करण्यात येत असून लवकरच या निवडणुकीचा बिगुल वाजण्याची शक्यता आहे. परंतु त्याआधीच अनेक राज्यांमध्ये राजकीय घडामोडींना मोठा वेग आला आहे. त्यातच काँग्रेस पक्षाची स्थिती सुधारण्या ऐवजी घसरताना दिसत आहे.
गेल्या काही महिन्यांपूर्वी पंजाब मधील काँग्रेसच्या पक्षांतर्गत वादानंतर आता उत्तराखंडमध्ये देखील अशाच प्रकारच्या अंतर्गत वादाला तोंड फुटले दिसून येत आहे. उत्तराखंडमध्ये विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीच काँग्रेसचे निवडणूक कमांडर आणि माजी मुख्यमंत्री हरीश रावत यांनी मोठा दणका दिला. प्रदेश काँग्रेस निवडणूक प्रचार समितीचे अध्यक्ष हरीश रावत यांनी इंटरनेट मीडियामध्ये पोस्ट करून आपल्याच पक्षाची खिल्ली उडवली आहे. पक्षात हा ट्रेंड असाच सुरू राहिल्यास राजकारणातून संन्यास घेऊ, अशी धमकी दिली.
रावत यांचे मीडिया सल्लागार आणि प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष सुरेंद्र अग्रवाल यांनी पक्षाचे प्रदेश प्रभारी देवेंद्र यादव यांना भाजपचे एजंट संबोधून आगीत तेल ओतल्याने आणखीनच खळबळ उडाली आहे. काँग्रेसचे सरचिटणीस हरीश रावत हे स्वत:ला पक्षाचा निवडणूक चेहरा घोषित करण्याची मागणी अनेक दिवसांपासून करत आहेत, मात्र काँग्रेस हायकमांडने त्याकडे दुर्लक्ष केले आहे.
काँग्रेसचे प्रदेश प्रभारी देवेंद्र यादव आणि इतर केंद्रीय नेते एकत्रित नेतृत्वाखाली निवडणूक लढविणार असल्याची चर्चा आहे. अलीकडेच, काँग्रेसच्या राज्य स्क्रीनिंग समितीचे अध्यक्ष अविनाश पांडे यांनी त्याचा पुनरुच्चार केला. हायकमांडच्या या भूमिकेवर रावत कॅम्प समाधानी नाही. आत्तापर्यंत रावत किंवा त्यांच्या निकटवर्तीयांनी या प्रकरणी जाहीरपणे भाष्य केले नव्हते, मात्र खुद्द हरीश रावत यांनी इंटरनेट मीडियावर पोस्ट टाकून आघाडी उघडली.
फेसबुक आणि ट्विटरवर केलेल्या पोस्टमध्ये रावत यांनी संस्थेवर निवडणुकीच्या वेळी सहकार्य करण्याऐवजी नकारात्मक भूमिका केल्याचा थेट आरोप केला. विशेष म्हणजे त्यांनी प्रदेश प्रभारी किंवा अन्य कोणत्याही केंद्रीय नेत्याचे नाव घेतले नाही, मात्र निवडणूक कोणाच्या सांगण्यावरून पुढे जायचे, असे म्हटले आहे.
https://twitter.com/ANI/status/1473612187742584833?s=20
यातून एक हेतू स्पष्ट दिसत आहे की, रावत यांनी हायकमांड आणि त्यांचे प्रतिनिधी, म्हणजे राज्याचे प्रभारी आणि उत्तराखंडला पाठवलेल्या इतर केंद्रीय नेत्यांवर निशाणा साधला आहे. ७३ वर्षीय रावत यांनी पक्षाला भावनिक इशारा पाठवला की, आता पुरे झाले, माझी राजकीय दृष्टिकोनातून निवृत्तीची वेळ आली आहे. महत्त्वाचे म्हणजे, रावत यांनी आपल्या पोस्टच्या शेवटी श्रीमद भगवद्गीतेतील एका श्लोकाचा हवाला देत आपण नम्र राहणार नाही आणि पळून जाणार नाही, असे म्हटले आहे.
रावत यांचे जवळचे असलेले गोदियाल यांच्याकडे प्रदेश काँग्रेस कमिटीची कमान सोपवण्यात आली आहे. त्याचवेळी रावत यांचे कट्टर विरोधक मानले जाणारे प्रीतम सिंह यांना प्रदेशाध्यक्षपदावरून हटवून विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी नियुक्ती करण्यात आली. रावत यांच्या इच्छेनुसार उत्तराखंडमधील काँग्रेस निवडणुकीसाठी ही टीम तयार करण्यात आल्याचे मानले जात आहे, असे असतानाही हरीश रावत आता संघटनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत.