विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावरून आणखी एकदा दिल्लीतील राजकारण तापले आहे. पश्चिम बंगाल आणि ओडिशामध्ये आलेल्या ‘यास‘ चक्रीवादळात झालेल्या नुकसानाचा आढावा घेण्यासाठी मोदींनी कोलकातामध्ये बैठक बोलावली होती. त्या बैठकीला ममतांनी दांडी मारल्यामुळे नवा वाद उद्भवला आहे. राज्य संकटात असताना राजकारण करीत असल्याचा आरोप त्यांच्यावर होत आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ममता बॅनर्जी संकटाच्या काळात राजकारण करीत असल्याचा थेट आरोप केला आहे. ममता यांचे वागणे दुर्दैवी आहे. चक्रीवादळाने अनेक लोकांचे आयुष्य उध्वस्त केले. त्यांना सहकार्य करण्याची मागणी सातत्याने होत आहे. मात्र ममता यांचा अहंकार जनकल्याणाच्या आडवा येत आहे, अशी टिका अमित शहा यांनी केली आहे.
पश्चिम बंगालचे मुख्य सचिव अलापन बंडोपाध्याय यांना केंद्र सरकारने तडकाफडकी दिल्लीला बोलावले आहे. मोदी यांनी यापूर्वीदेखील हवाई सर्वेक्षण केले होते. त्यानंतर ओडिशातही बैठक घेऊन मदत जाहीर केली होती. आता पुन्हा एकदा बैठक घेण्यात आली होती.
ममता २० मिनीटे लेट
कोलकाता येथील कलाईकुंडा एअरफोर्स बेसला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बैठक घेतली. इथेही ममता बॅनर्जी किंवा कोणतेही अधिकारी उपस्थित नव्हते. मुख्य सचिव अलापन यांच्यासोबत ममता २० मिनीटे उशिराने पोहोचल्या. त्यानंतर त्यांनी मोदींना स्वतंत्र वेळ मागून आपला अहवाल सादर केला. तसेच २० हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर करण्याची मागणी केली.