मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा मुहूर्त लागला असून लवकरच तीनही पक्षातील इच्छुकांना यामध्ये संधी मिळणार असल्याची माहिती आहे. मात्र, नेमका कुणाचा नंबर लागणार याबाबत अद्यापही संभ्रम आहे. परिणामत: इच्छुकांच्या मनातल्या मनात आनंदाच्या उड्या मारणे सुरू झाले आहे.
राज्यातील महायुतीच्या सरकारचा विस्तार होणार असून त्याबद्दल बरेच तर्कवितर्क लावण्यात येत आहे. काहींनी शरद पवारांसोबत असलेला एक मोठा नेता अजित पवार यांच्या गटात येणार असल्याची चर्चा सुरू केली आहे. त्या नेत्यालाही मंत्रिमंडळ विस्तारात स्थान मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे. अशात शिंदे गटातील नाराज आमदार भारत गोगवले, संजय शिरसाट यांनादेखील मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे विस्तारात कुणाचा नंबर लागणार, हे पाहण्याजोगे ठरणार आहे. विस्तारासाठी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात तब्बल ४० बैठका झाल्या. या बैठकीत राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार, आगामी लोकसभा तसेच विधानसभा निवडणूकीबाबत महायुतीची रणनिती याबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे. राज्यातील मंत्रिमंडळाचा तिसरा विस्तार पुढील आठवड्यात होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.
इच्छुकांमध्ये आनंदाचे वातावरण
मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची माहिती पुढे येताच इच्छुकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. आपल्याच गळ्यात मंत्रिपदाची माळ मिळावी म्हणून अनेक इच्छुकांनी लॉबिंग सुरू केल्याचेही सूत्रांनी सांगितले आहे. त्यामुळे तिसऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात नेमक्या कोणत्या गटातील आमदारांना संधी मिळणार? याकडेच सर्वांचे लक्ष लागून आहे. दरम्यान, महायुती सरकारचा तिसरा मंत्रिमंडळ विस्तार विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनापूर्वीच होणार असल्याचे सांगितले जात होते. पण हा विस्तार झाला नाही. आता अधिवेशनही संपले आहे. तसेच निवडणुकांना ७ ते ८ महिने बाकी आहेत. या पार्श्वभूमीवर हा विस्तार होणार असल्याचे सांगितले जात आहे.
politics cabinet expansion pune amit shah visit
shinde fadanvis pawar ncp bjp shivsena