मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिवसेनेतून बंडखोरी करुन तब्बल ४० पेक्षा अधिक आमदारांना एकत्र आणणाऱ्या एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पद देऊन भारतीय जनता पक्ष आणि देवेंद्र फडणवीस यांनी राजकारणातील मोठी चाल खेळली आहे. एकाच दगडात अनेक पक्षी मारण्याचे कसब या एका निर्णयाने केले आहे. या निर्णयामागे शिवसेना संपविण्याचा मोठा डाव भाजपचा आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. यासंदर्भातील जाणकारांनी उपस्थित केलेले काही महत्त्वाचे मुद्दे असे
लवकरच मुंबई महापालिकेची निवडणूक होणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून महापालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे. एकीकडे महाराष्ट्राचे बजेट आणि दुसरीकडे महापालिकेचे बजेट. म्हणजेच, राज्याप्रमाणेच मुंबई महापालिका अतिशय महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे या महापालिकेवर कब्जा मिळविण्यासाठी भाजपचे कसोशीचे प्रयत्न आहेत. यासाठीच फडणवीस हे आता पूर्ण ताकदीनिशी या निवडणुकीत उतरणार आहेत. काहीही करुन शिवसेनेला राज्याबरोबरच महापालिकेतूनही सत्तेतून हद्दपार करण्याचा डाव आहे. जर फडणवीस मुख्यमंत्री झाले असते तर त्यांना फार वेळ निवडणुकीसाठी देता आला नसता. तो आता देता येईल आणि अनेकानेक डावपेच आखता येतील.
उद्धव यांचे सरकार पाडले, हे बालंट अंगाशी येऊ नये म्हणूनही एकनाथ शिंदे यांच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ टाकण्यात आली आहे.
शिदे मुख्यमंत्री झाल्याने आता उद्धव यांच्या नेतृत्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण होईल. जे उद्धव यांनी केले नाही ते आम्ही केले. असे दाखविण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.
शिवसेनेमध्ये थेट उभी फूट पाडण्यात सर्वप्रथम यश आले ते बंडखोरी करुन. ही मूळ बंडखोरी ही सुद्धा भाजपच्या पाठिंब्यामुळेच झाली. पुढे ते बंड यशस्वीही केले. आता यापुढील काळात शिवसेनेत अधिकाधिक संभ्रम कसे निर्माण होतील. उद्धव हे कसे अयोग्य आहेत हे दाखविण्याचा पूरेपूर प्रयत्न केला जाईल
सर्वसामान्य शिवसैनिकांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी अनेकविध मार्ग यापुढील काळात वापरले जातील. त्यासाठीच फडणवीस यांनी सत्तेचा रिमोट कंट्रोल स्वतःकडे ठेवला आहे.
उद्धव यांनी निरोपाचे भाषण करुन जनतेची सहानुभूमीत मिळवली. पण, आता सत्तेपासून दूर राहत आपणच खरे किंगमेकर असल्याचा संदेश फडणवीस यांनी दिला आहे.
शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकार स्थापन झाल्यानंतर उद्धव यांच्या नेतृत्वातील शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण होईल. शिंदे गट हे शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्हासाठी भांडावे ही कदाचित भाजपची पुढील खेळी असेल. त्याचबरोबर अनेक कायदेशीर बाबी सुद्धा लढविण्यासाठी भाजप शिंदे गटाला बळ देईल, अशी शक्यता आहे.
मुख्यमंत्रीपदाचा शब्द देऊन तो फिरवला याबाबत अमित शहा यांची बदनामी केल्यामुळे आता उद्धव यांना चांगलाच धडा शिकविण्याचा चंग शहा यांच्यासह भाजप टीमने बांधल्याची जोरदार चर्चा आहे. आपल्याच पक्षात सर्वप्रथम नामोहरम करायचे, सत्तेवरुन खाली खेचायचे, नव्या सत्तेत आपण बाजूला रहायचे यासह अनेक डावपेच खेळण्यात आले आहेत.
Politics BJP Strategy Shinde group Shivsena Fight