नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सुरत कनिष्ठ न्यायालयाने राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर त्यांची खासदारकीही रद्द करण्यात आली आहे. त्यानंतर काँग्रेस व विरोधक आक्रमक झाले आहेत. मात्र भाजपने यामध्येही राजकीय खेळी केली असून त्यात नवा मुद्दा चर्चेला टाकला आहे. भाजपच्या नेत्यांनी न्यायालयाच्या निर्णयानंतर राहुल गांधी ओबीसीविरोधी असल्याची टीका केली आहे. गांधी हे ओबीसीविरोधी असल्याचा मुद्दा प्रकर्षाने मांडण्याची रणनिती भाजपने आखली आहे.
राहुल गांधी यांनी २०१९ च्या निवडणुक प्रचारादरम्यान ‘सगळ्या चोरांचे आडनाव मोदी का असते?’ असे विधान केले होते. त्यानंतर त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात आरोप झाले, टीकाही झाली. त्याचवेळी सुरत कनिष्ठ न्यायालयात त्यांच्याविरोधीत खटलाही चालविण्यात आला. त्यावर निर्णय देत न्यायालयाने राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ओबीसी समाजाचे आहेत आणि राहुल यांच्या विधानामुळे ओबीसी समाज दुखावला आहे, असे भाजपचे म्हणणे आहे. त्यामुळे न्यायालयाच्या निर्णयानंतर भाजपच्या प्रमुख नेत्यांनी राहुल यांना ओबीसीविरोधी म्हटले आहे.
भाजपाध्यक्ष जे.पी. नड्डा म्हणाले की, ‘न्यायालयाने राहुल यांना वारंवार संधी दिली. ओबीसी समाजाची माफी मागायला लावली. पण राहुल यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. राहुल हे अहंकारी आहेत. त्यांनी संपूर्ण ओबीसी समाजाला चोर म्हटले. त्यामुळे हा समाज मोठ्या प्रमाणात दुखावला आहे.’ रविशंकर प्रसाद यांनीही जोरदार टीका केली आहे. राहुल गांधी यांनी आपल्या विधानातून आपण ओबीसी विरोधी आहोत, हे सिद्ध केल्याचे म्हटले. त्यांनी केवळ मोदी आडनावाचा नव्हे तर संपूर्ण ओबीसी समाजाचा अपमान केल्याचेही ते म्हणाले.
ओबीसी हाच आधार
भाजपने गेल्या दोन्ही लोकसभा निवडणुकांमध्ये आणि उत्तर प्रदेशातील दोन्ही विधानसभा निवडणुकांमध्ये ओबीसी हाच आधार ठेवला. ओबीसींच्या समस्या, त्यांचे प्रश्न, त्यांचा प्राधान्य याच धरतीवर या निवडणुका लढविण्यात आल्या. २०२४ च्या लोकसभा ध्यानात घेता भाजपने आधीपासूनच आपले ओबीसी कार्ड चालवायला सुरुवात केली आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
Politics BJP Strategy for Rahul Gandhi and Congress