मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि भाजप नेत्यांमध्ये कितीही मधूर संबंध असले तरीही दोघेही एकमेकांच्या विरोधात टीका करायला मागेपुढे बघत नाहीत. पण बरेचदा प्रत्यक्ष भेटीत त्या आरोप-प्रत्यारोपांचा उल्लेखही होत नाही. मात्र एका तरुणाने पवारांवर आक्षेपार्ह विधान केल्यानंतर त्याला भाजपने चांगल्या पगाराची नोकरी दिली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल नाशिकमधील निखिल भामरे या तरुणाने सोशल मिडियावर आक्षेपार्ह विधान केले होते. गेल्यावर्षीची ही घटना आहे. या घटनेचे पडसाद राज्यभर उमटले होते. महाराष्ट्रातील जवळपास सात शहरांमध्ये निखील भामरे याच्या विरोधात गुन्हे दाखल झाले होते. त्यानंतर निखिल भामरेला अटकही झाली होती. जवळपास एक महिना तो तुरुंगात होता. आणि आता त्याला भाजपने सोशल मिडिया सेलचा सहसंयोजक केले आहे. शरद पवार यांच्याबद्दल अत्यंत खालच्या भाषेत आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या तरुणाला भाजपने सोशल मिडिया सहसंयोजक केल्यामुळे राष्ट्रवादीतून मोठ्या प्रमाणात विरोध केला जात आहे. राष्ट्रवादीचे आमदार आणि युवा नेते रोहित पवार यांनी तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला आहे. समाजात विकृतीला खतपाणी घालण्याचे काम भाजप करत असल्याचे या प्रकारामुळे सिद्ध झाल्याचे रोहित पवार यांनी म्हटले आहे.
काय होते पोस्टमध्ये
भाजपचा आत्ताचा सोशल मिडिया सहसंयोजक निखिल भामरे याने एक वर्षापूर्वी सोशल मिडियावर शरद पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट केली होती. ‘वेळ आली आहे. बारामतीच्या गांधीसाठी, बारामतीचा नथुराम गोडसे तयार करायची. #बाराचाकाकामाफी माग..’ असे ट्वीट त्याने केले होते.
politics bjp social media nikhil bhamre appointment satana nashik district