नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सुमारे दोन दशकांहून जुनी भाजप-शिवसेना युती का तुटली याबाबत वेगवेगळी कारणे, तर्कवितर्क दिले जात असतानाच नुकत्याच झालेल्या एनडीए खासदारांच्या बैठीकत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही युती शिवसेनेने तोडल्याचा दावा केला. त्याला प्रत्युत्तर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि पूर्वाश्रमीचे भाजपवासी राहिलेले एकनाथ खडसे यांनी ही युती का तुटली यावर मोठा खुलासा केला आहे.
राज्यात शिवसेना आणि भाजप यांची युती ही सर्वांत लांब चाललेली युती मानण्यात येते. मोठा भाऊ कोण, लहान कोण, यावरून टोमणे-शेरेबाजी होत राहायची. पण, ही युती २०१९ पर्यंत अभेद्य होती. काही प्रसंगांमध्ये दोन्ही पक्षांनी परस्परविरोधी भूमिका घेतली. तर काहीवेळा दोघेही स्वतंत्र निवडणुका लढलेत आणि निकालानंतर सत्तेत एकत्र आलेत. बाळासाहेब ठाकरे, अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवानी, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांनी ही युतीची मोट बांधली होती. त्यात एकनाथ खडसे हे भाजपात असताना त्यांनी देखील महत्त्वाची भूमिका बजावली होती. आता ते राष्ट्रवादीत असून त्यांनी या युती तुटण्यामागील कारण स्पष्ट केले आहे.
एकनाथ खडसे यांनी नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत खडसे यांनी पंतप्रधान मोदींच्या वक्तव्याचं खंडन केलं. एकनाथ खडसे म्हणाले, ‘काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय जनता पार्टीच्या खासदारांची बैठक आयोजित केली होती. खासदारांना २०१४ ला शिवसेनेने युती तोडली. आम्ही तोडली नाही असे म्हणाले. मात्र, नरेंद्र मोदी जे बोलले ते अर्ध सत्य बोलले’.
त्यावेळी मी केला उद्धव ठाकरेंना फोन
मी त्यावेळेस विरोधी पक्षनेता होतो, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या विरोधात वातावरण झाले होते. त्यावेळेस भाजप-सेनेचे सरकार येईल, असा विश्वास आम्हाला होता. त्यावेळेस अनेक लोक भाजपमध्ये यायला लागले होते, तिकीट मागायला लागले होते. तेव्हा भाजपने एकट्याने निवडणुका लढवाव्या असे मत झाले. त्यानंतर दोन-अडीच महिन्यापूर्वी हा निर्णय झाला आणि भाजपने युती तोडली. सुधीर मुनगंटीवार, देवेंद्र फडणवीस आणि मीही होतो. त्यावेळेस हे कोणी आणि कसे सांगावे, यावर आमच्यात खल झाला. मला त्यावेळेस मुंबईला तातडीने बोलावले. देवेंद्र फडणवीस हे त्यावेळी अध्यक्ष होते. त्यांनी ही घोषणा करायला पाहिजे. मात्र, त्यावेळेस माझ्यावर जबाबदारी सोपवली. त्यामुळे मी उद्धव ठाकरे यांना फोनकरून सांगितले की त्यावेळेस जागा वाटपावरून जमत नसल्याचे कारण सांगून मी युती तोडली, असे खडसे यांनी स्पष्ट केले.
Politics BJP Shivsena Alliance Break eknath khadse
NCP Leader Narendra Modi Nashik Press Conference