मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – एकनाथ शिंदे गटाने भाजप सोबत संसार थाटला आहे. मात्र, शिंदे गटाची रणनिती काही वेगळीच असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळेच शिंदे गट भाजपच्या सोबत आणि विरोधातही राहणार असल्याचे दिसून येत आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी शिंदे गटाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिंदे गट आणि भारतीय जनता पक्ष काही जागांवर युतीने तर काही जागांवर स्वतंत्रपणे निवडणूक लढवतील. याआधी ऑगस्टमध्ये शिंदे म्हणाले होते की, शिंदे गट आणि भाजप महाराष्ट्रात महापालिका निवडणुका एकत्र लढतील. त्यांच्या नेतृत्वाखालील गट हीच खरी शिवसेना असल्याचा दावा त्यांनी केला. देशातील सर्वात श्रीमंत बृहन्मुंबई महानगरपालिकेसह राज्यातील अनेक नगरपालिकांच्या निवडणुका लवकरच होणार आहेत.
शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आमदारांनी केलेल्या बंडामुळे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार यावर्षी ३० जून रोजी कोसळले आणि महाराष्ट्रात शिंदे-भाजप युतीची सत्ता आली. नागपुरात पत्रकारांशी बोलताना फडणवीस म्हणाले की, “मुख्यमंत्री एकनाथ शिदे यांच्या नेतृत्वाखाली भाजप आणि शिवसेनेचे गट काही नागरी निवडणुका स्वतंत्रपणे लढतील, तर इतर नागरी निवडणुकांमध्ये युती होईल.” नागरी निवडणुकांचे वेळापत्रक राज्य निवडणूक आयोग जाहीर करेल. आयोगाने यापूर्वी जाहीर केलेल्या कार्यक्रमाला न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. त्यामुळे आम्हाला न्यायालयाच्या निर्णयाची वाट पाहावी लागेल,” असे फडणवीस म्हणाले.
इतर मागासवर्गीयांसाठी (ओबीसी) निवडणुकीत कोटा लागू करण्याचा महाराष्ट्र सरकारचा प्रयत्न सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी फेटाळला होता. त्यासाठी राज्याने अतिरिक्त वेळ मागितला होता, मात्र न्यायालयाने तो फेटाळला. कोट्याशिवाय निवडणुका घ्याव्यात, असे निर्देश दिले. या महिन्याच्या सुरुवातीला, सर्वोच्च न्यायालयाने बीएमसीमधील जागांची संख्या कमी करणाऱ्या महाराष्ट्र अध्यादेशाच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणारी याचिका स्वीकारण्यास नकार दिला. त्यामुळे नागरी निवडणुका घेण्याचा मार्ग मोकळा झाला. या याचिकेत महाराष्ट्र सरकारच्या २३६ वरून २२७ जागा कमी करण्याच्या निर्णयाला आव्हान देण्यात आले आहे.
Politics BJP Shinde Group Strategy Upcoming Elections