मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाविकास आघाडीने आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने जागा वाटपाचा फॉर्म्युला जाहीर केल्यानंतर भाजपने विधानसभा निवडणुकीसाठी त्यांचे गणित मांडले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी मांडलेल्या या फार्म्युल्याने भाजप आणि शिंदे गटात नवीन वाद सुरू झाला असून ही चर्चा आता कुठल्या वळणावर थांबणार हे पाहण्याजोगे राहणार आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी येत्या विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेला (शिंदे गट) केवळ ४८ जागा देऊ, अशी घोषणा केली. त्यांच्या या घोषणेवर शिंदे गटाने नाराजी व्यक्त केली आहे. बावनकुळे यांच्या या वक्तव्याची भाजपकडून सारवासारव केली जात आहे. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीदेखील याबाबत खुलासा केला आहे. ते म्हणाले,‘भाजप आणि शिवसेना यांच्यातील २०२४च्या विधानसभेच्या जागावाटपाचा फॉर्म्युला अजून ठरलेला नाही. माझ्या कानावर असे काही आलेले नाही. बावनकुळे काय बोलले मला माहित नाही. जागा वाटप संदर्भात दोन्ही पक्षाच्या कोअर कमिटीत निर्णय होईल, जागावाटपाचा फार्म्युला त्या त्या पक्षाच्या क्षमतेवर ठरेल.’
मुनंगटीवार यांच्या पाठोपाठ शिवसेना शिंदे गटाकडून कृषिमंत्री दादा भुसे यांनी जागा वाटपाबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचे सांगून नवीन ट्विस्ट आणला आहे. तसेच ४८ ते ५० जागांपुरती शिवसेना मर्यादित नसूल लवकरच चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, असेदेखील ते म्हणाले आहेत. दरम्यान, बावनकुळेंच्या भाषणाचा तो व्हिडिओ भाजपने सोशळ मिडियामधून हटविला आहे. त्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.
अर्धवट व्हिडिओ दाखविल्याचा दावा
जागावाटपाच्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाल्याने चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्वत: याबाबत खुलासा केला आहे. ‘त्या व्हिडिओमधील अर्धाच भाग दाखवण्यात आला. शिवसेना आणि भाजप २८८ जागा युतीत लढणार आहे. आमचे एनडीए घटक पक्षही असतील. राष्ट्रीय नेत्यांच्या नेतृत्वात आम्ही २०० जागा आम्ही जिंकणार आहोत. पूर्वी युतीला मिळाल्या नाही, तेवढे मोठे बहुमत आम्हाला मिळेल. त्याच्या तयारीची आमची बैठक होती. विपर्यास करून क्लिप दाखवण्यात आली आहे,’ असे ते म्हणाले.
Politics BJP Shinde Group Seat Sharing Controversy