मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भाजप आणि शिंदे गटाच्या युतीत बिघाडाची चिन्हे दिसताहेत. शिंदे गटाचे खासदार असलेल्या जागांवर भाजपने तयारी सुरू केली आहे. त्यामुळे वातावरण तापलेले आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने दोन्ही पक्षातील धुसफुस पुढे येत आहे. यामुळे युतीत आलबेल नसल्याची चर्चा जोरात सुरू झाली आहे.
मुख्यमंत्री शिंदे यांनी लोकसभेच्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे. त्यांनी त्यांच्या गटातील खासदारांची तीन दिवसांपूर्वी बैठक घेतली व त्यानंतर लोकसभेच्या २२ जागा युतीमध्ये मागण्याची भाषा सुरू झाली. मात्र, त्याचवेळी भाजपने शिंदेंच्या १३ खासदारांच्या मतदारसंघांमध्ये समांतर प्रचार यंत्रणा राबविण्याचे काम हाती घेतले आहे. शक्तीकेंद्र प्रमुखांपासून प्रत्येक लोकसभा मतदारसंघात प्रचारासाठी संघटनात्मक ढाचा तयार केला आहे.
कोणते मतदारसंघ शिंदेंच्या शिवसेनेकडे जातील याचा विचार न करता प्रत्येक ठिकाणी सारखीच जय्यत तयारी करा, असे आदेश देण्यात आले आहेत. यामुळे शिंदे गटातील लोकप्रतिनिधींची चिंता वाढली आहे. भाजपइतकी संघटनात्मक रचना शिंदे गटाकडे नाही. त्यामुळे त्यांना भाजपवरच अवलंबून राहावे लागेल. भाजपची तयारी आपल्याला पूरकच असल्याचे शिंदे गटाला वाटत होते. पण तयारी करता करता भाजप जागेवर दावा तर सांगणार नाही ना, अशी शंका शिंदे समर्थकांना सतावत आहे.
महाविजय २०२४ गाजणार
भाजपकडे असलेले मतदारसंघ किंवा शिंदेंच्या खासदारांकडे असलेले, असा कोणताही भेद न करता जोरदा तयारीला लागा, असे आदेश ‘महाविजय २०२४’ हे मिशन राबवित असलेल्या पक्षाच्या समितीलाच नव्हेतर, खालपर्यंतच्या यंत्रणेलादेखील देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
Politics BJP Shinde Group Loksabha Election