मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – युती, महायुती किंवा आघाडी, महाआघाडी काहीही असो. जोपर्यंत निवडणुकांमध्ये जागावाटपाचा विषय येत नाही तोपर्यंत सारे आलबेलच बघायला मिळते. महाविकास आघाडीतही तेच सुरू आहे आणि महायुतीतही तेच सुरू आहे. आता तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जागावाटपाबद्दल आपली भूमिकाच स्पष्ट केली आहे.
काही दिवसांपूर्वी भाजपच्या नेत्यांनी शिवसेनेच्या मतदारसंघांवर दावा ठोकल्यामुळे शिंदे व फडणविस यांच्यात ठिणगी पडली होती. जोरदार वाद रंगले. एकमेकांच्या विरोधात बोलायला सुरुवात झाली. एवढेच नव्हे तर आपले वर्चस्व सिद्ध करण्यासाठी ‘राष्ट्रात नरेंद्र मोदी, महाराष्ट्रात एकनाथ शिंदे’ अशी जाहिरातही प्रसिद्ध करण्यात आली. त्यामुळे एकत्र असूनही दोन्ही पक्षांमध्ये अंतर वाढत होते. त्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या काही बैठका झाल्या आणि पुन्हा महायुतीने मुठ घट्ट केली. ४० आमदार आणि १३ खासदार घेऊन भाजपसोबत सत्ता स्थापन केल्यानंतर शिंदे गटाने आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी देव पाण्यात ठेवले आहेत. कारण जागावाटपांवरून आत काहीही ठरलेले असले तरीही बाहेर होणाऱ्या विधानांनी धडकी भरतेच. अलीकडेच देवेंद्र फडणवीस यांनी एका कार्यक्रमात बोलूनच दाखवले. ‘त्यांनी ज्या जागा जिंकलेल्या आहेत त्या त्यांच्याकडेच राहणार आहेत आणि आमच्या जागा आम्हीच लढवणार आहोत,’ असे सांगतानाच दोन्हीकडे उमेदवार सक्षम आहे का, हेही एकदा पुन्हा तपासले जाणार आहे, असेही फडणवीस म्हणाले.
फक्त १३ जागा?
लोकसभेत शिवसेनेच्या वाट्याला १३ जागा आल्या, तर आश्चर्य वाटायला नको. शिवसेनेचे एकूण १८ खासदार होते. त्यातील १३ शिंदे गटात आहेत. उर्वरित पाच खासदार उद्धव यांच्याकडे आहे. त्या पाच जागांवर ठाकरेंच्या विरोधात भाजपचे उमेदवार उतरविण्याची तयारी फडणवीस यांनी केली आहे, असे सूत्रांकडून कळते.
ठाकरेंमध्ये परिवर्तन
एकेकाळी मुस्लीमांचा कडव्या शब्दांत विरोध करणाऱ्या उद्धव ठाकरेंमध्ये मोठे परिवर्तन झाल्याचे दिसून येत आहे. फडणवीस यांनी तर समान नागरी कायद्याचा दाखला देत उद्धव ठाकरे हे मुस्लीमांचे नवे मसिहा असल्याचा टोमणा मारला आहे. या कायद्याविरोधात मुस्लीम संघटनांनी उद्धव यांच्याकडे धाव घेतली.