ठाणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आतापर्यंत राज्यात महाविकास आघातील भांडणांची आणि नाट्यमय घडामोडींची चर्चा होती. अजित पवार भाजपमध्ये जातात का, शरद पवार भाकरी कुठे फिरवणार, या साऱ्या प्रश्नांमुळे काँग्रेस आणि ठाकरे गट अस्वस्थ होता. पण आता शिंदे गट आणि भाजप आमने सामने उभे ठाकले आहेत. उल्हासनगरातील बॅनरवॉर बघून त्याचा अंदाज येतो.
लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने मतदारसंघांवरील दावे प्रतिदावे सुरू झाले आहेत. मात्र थेट श्रीकांत शिंदे यांच्या मतदारसंघावर भाजपने दावा ठोकल्यामुळे अधिकच तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर श्रीकांत शिंदे यांनी बंडाची भाषा केली होती. तेवढ्यावर भाजप थांबले नाहीत तर त्यांनी कल्याण-डोंबिवलीमध्ये शिंदे गटाला डिवचणारे बॅनर्स लावले. आता हा वाद उल्हासनगरात चव्हाट्यावर आला आहे. उल्हासनगरमध्ये शिंदे गटाने भाजपला डिवचणारे बॅनर्स लावले होते. त्याला उत्तर म्हणून भाजपने ‘देवेंद्र फडणवीस बस नाम ही काफी है’ असा मजकूर असलेले बॅनर झळकवले आहे. या बॅनरवर ‘५० कुठे? १५० कुठे?’ असे लिहून शिंदे गटाला थेट डिवचण्याचा प्रयत्न भाजपच्या लोकांनी केला आहे.
आता सत्ताधारीच भांडत असल्यामुळे विरोधक त्याचा आनंद लुटत आहेत. ‘हा आमच्या भाजपचा मोठेपणा’ असा मजकूर बॅनरवर लिहून आमच्या नेत्यांचा मोठेपणा अलल्यामुळे शिंदेंना मुख्यमंत्री केले, असे स्पष्टपणे त्यांना सुचवायचे आहे. आता हे प्रकरण चांगलेच गाजणार असे दिसत आहे. विशेष म्हणजे शिंदे गटाकडून प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीच्या प्रकरणानंतर उल्हासनगरातील बॅनर प्रकरण मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या कोर्टात जाऊन पोहोचले आहे.
पंकजा मुंडेंचाही फोटो?
निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर कुठलेही पद नाही, कुठलीही जबाबदारी नाही, यामुळे पक्षावत सतत नाराजी व्यक्त करणाऱ्या पंकजा मुंडे यांनी अलीकडेच दुसरा पक्ष स्थापन करण्याचे संकेत दिले होते. मात्र उल्हासनगरात भाजपच्या लोकांनी लावलेल्या बॅनर्सवर पंकजा मुंडे यांचा फोटो झळकल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.