विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
आगामी वर्षात पाच राज्यांमध्ये होणार्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षांतर्गत समन्वय आणि ताळमेळ बसविण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. त्याअंतर्गत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी शनिवारी (२६ जून) पक्षाच्या मुख्यालयात महत्त्वाची चर्चा केली. पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी बोलाविलेल्या बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री उपस्थित होते.
आगामी वर्षात उत्तर प्रदेशसारख्या महत्त्वाच्या राज्यांशिवाय उत्तराखंड, पंजाब, मणिपूर आणि गोव्यात निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर भाजपकडून विविध पातळीवर आढावा घेण्यात येत आहे. पाच राज्यांच्या निवडणुकांची तयारी हाच बैठकीचा उद्देश होता असे एका नेत्याने बैठकीनंतर सांगितले.
पक्षाचे नेते आणि कॅबिनेट मंत्र्यांमधील समन्वय भक्कम ठेवणे, सरकारी योजनांची प्रभावीपणे अंलबजावणी करणे किंवा त्यामध्ये सुधारणा करून जास्तीत जास्त लोकांचा पाठिंबा मिळविण्यासाठी बैठकीत चर्चा करण्यात आली. कोरोना संकटाशी लढा देण्याच्या उपाययोजनांवरही चर्चा करण्यात आली. विशेषकरून भाजपशासित राज्यात सरकारकडून करण्यात आलेली मदत आणि महामारीला रोखण्याच्या प्रयत्नांना अधोरेखित करण्यावरही चर्चा करण्यात आली.
पक्षाचे खासदार आणि इतर लोकप्रतिनिधींदरम्यान चांगला समन्वय ठेवण्यावर तसेच संघर्षाऐवजी ताळमेळ साधण्यावर चर्चा करण्यात आली. केंद्र सरकारच्या कल्याणकारी योजनांची चांगली अंमलबजावणी करण्यासाठी खासदार आणि आमदारांसह पक्ष संघटनेच्या सहकार्यावर भर देण्यात आला. या कामांबाबत पक्षाकडून एक आराखडा तयार करण्यात येणार असून, त्याचा वेळोवेळी आढावाही घेण्यात येणार आहे. बैठकीत केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, निर्मला सीतारमण, नरेंद्र सिंह तोमर, स्मृती ईराणी, हरदीपसिंह पुरी, धर्मेंद्र प्रधान, किरण रिजीजू आणि प्रल्हाद जोशी यांच्याशिवाय भूपेंद्र यादव आणि इतर वरिष्ठ नेते उपस्थित होते.