रत्नागिरी (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात रंगलेला ‘कुटुंब’ वाद अद्याप शमलेला नाही. दोन्ही नेत्यांनी आरोप-प्रत्यारोप केल्यानंतर आता समर्थक नेत्यांची वेगवेगळी विधाने पुढे यायला लागली आहेत. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी तर थेट उद्धव यांच्या कुटुंबियांवर दोन कार्यकर्त्यांच्या खुनाचाच आरोप केला आहे.
नारायण राणे यांनी ज्या रागात शिवसेना सोडली, तो राग अद्याप शांत झालेला नाही. त्यांना जरा कुठे संधी मिळाली की ते ठाकरे कुटुंबियांबद्दल कुठला तरी गौप्यस्फोट नक्कीच करतात. तीन दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांच्या कुटुंबावरून टिका केली. त्याला प्रत्युत्तर म्हणून देवेंद्र यांनी ठाकरेंच्या कुटुंबियांवर हल्लाबोल केला. मात्र आता नारायण राणे यांनी थेट मातोश्रीची पहिली इमारत कशी उभी झाली आणि जया जाधव व रमेश मोरे या कार्यकर्त्यांचा खून कसा झाला? असे सवाल उद्धव ठाकरे यांना केले आहेत. आम्ही खोके दिले नसते तर मातोश्रीची पहिली इमारत उभीच झाली नसती, असा दावा राणे यांनी केला आहे. ‘मनोहर जोशी यांच्यानंतर मी दुसरा नेता आहे ज्याने खोके द्यायला सुरुवात केली. जोशी मुख्यमंत्री असताना उद्धव त्यांच्यावरही नाराज होते. त्यानंतर मी मुख्यमंत्री झालो. तेव्हापासून तुमच्याकडे जे आले, ते कुणाच्या माध्यमातून आले?’ असा सवालही राणे यांनी केला आहे.
तुमच्या कुटुंबाचे काय?
देवेंद्र यांच्या कुटुंबाबद्दल बोलता मग रमेश मोरे आणि जया जाधव यांची हत्या का झाली, ते सांगा. पण आपल्या कुटुंबाबद्दल एखादी गोष्ट जरा कुणाला कुठे कळली, तर लगेच त्याची हत्या करतात. उद्धव यांच्या घरातील अंतर्गत प्रश्न असल्यामुळेच आमच्या दोन सोबत्यांची हत्या झाली. हेच लोक याला कारणीभूत आहेत, असा थेट आरोप राणेंनी केला.
त्या बॅगमध्ये काय होतं?
मी मुख्यमंत्री झाल्यावर तुमच्याकडे बॅगांमध्ये जे आले, ते काय होते? त्या बॅगांमध्ये काय होते? आम्ही प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये अमरुद आणले होते का? आणि तुम्ही ते घेतले, हे लोकांना सांगा ना. कोणता व्यवसाय करता हे देखील सांगा, असे आव्हानही राणे यांनी उद्धव ठाकरेंना दिले.