पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारतीय जनता पक्षाचे आमदार नितेश राणे यांच्या अडचणी वाढणार आहेत. कारण, राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना ‘हे बघा हिजड्यांचे सरदार,’ असे शब्द वापरले आहेत. त्यामुळे तृतीय पंथीयांचा अपमान झाला असल्याचे बोलले जात आहे. म्हणूनच तृतीयपंथी आक्रमक झाले असून त्यांनी आंदोलन सुरु केले आहे. आमदार नितेश राणे यांच्याविरोधात मध्यरात्रीपासून पुण्यातील बंडगार्डन पोलीस स्टेशनच्या बाहेर तृतीयपंथी समाजाच्यावतीने हे आंदोलन सुरु आहे. यावेळी आ. निलेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी तृतीयपंथीयांनी केली आहे.
या आंदोलनाला वंचितने पाठिंबा दिला आहे. वंचितचे नेते सुजात आंबेडकर हे आंदोलनस्थळी दाखल झाले आहेत. पुण्यात तृतीयपंथी आंदोलनाच्या ठिकाणी प्रकाश आंबेडकरांच्या पत्नी अंजली आंबेडकर यादेखील उपस्थित आहेत. नितेश राणेंवर गुन्हा दाखल कला या मागणीला वंचितचा पाठिंबा आहे. तशी मागणी सुजात आंबेडकर यांनी केली आहे.
दरम्यान, नितेश राणेंवर गुन्हा दाखल करण्यासंदर्भात पुणे पोलिसांनी वेळ मागितली आहे. काय कारवाई करणार यावर आज संध्याकाळपर्यंत वंचित आणि तृतीयपंथी नागरिकांना कळवले जाणार आहे. हे आंदोलक उच्च न्यायालयातही जाण्याची शक्यता आहे, असे कायदेतज्ज्ञ असीम सरोदे यांनी सांगितले. या आंदोलनानंतर नितेश राणे यांनी आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण देतांना सांगितले की, तृतीयपंथी समाजाने माझे वाक्य व्यवस्थित ऐकले नसेल. आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांचे वक्तव्य आहे. त्याचा आधार घेऊन मी बोललो आहे, असे ते म्हणाले.