मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बाबरी मशिदीवरून भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेवर केलेल्या आरोपांमुळे आता ते स्वतःच अडचणीत आले आहेत. आता भाजपमधूनच त्यांच्या विधानावर नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. विशेष म्हणजे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पाटलांवर चांगलेच नाराज झाल्याची माहिती आहे.
बाबरी मशीद पाडण्यात एकाही शिवसैनिकाचा हात नव्हता, असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं. 6 डिसेंबर 1992 रोजी अयोध्येतील बाबरी मशीद बजरंग दल, विश्व हिंदू परिषद आणि दुर्गा वाहिनीने पाडली तेव्हा शिवसेनेचा एकही कार्यकर्ता घटनास्थळी उपस्थित नव्हता. ‘मला अयोध्येतील कारसेवकांच्या सोयीसाठी बजरंग दलाने तीन-चार महिने तिथे ठेवले होते. यात सहभाग घेतलेले लोक बजरंग दल, विश्व हिंदू परिषद आणि दुर्गा वाहिनीचे होते,’ असे चंद्रकांत पाटील म्हणाले होते. त्यावरुन ठाकरे गट तर आक्रमक झालाच, पण आता स्वकीयांकडूनही चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका होत आहे.
पाटील यांना हे वक्तव्य टाळता आलं असतं, असं खुद्द आशिष शेलार म्हणाले आहेत. विशेष म्हणजे अमित शहांची भेट घेतल्यावर शेलार यांनी ही प्रतिक्रिया दिली. त्यामुळे येत्या काही दिवसांत पक्षामध्येही चंद्रकांत पाटील यांच्या अडचणी वाढणार असंच दिसत आहे. चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्यानंतर संजय राऊत यांनी त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. ‘एवढे दिवस पळपुटे चंद्रकांत पाटील कुठे होते?’ असा थेट सवालही राऊतांनी केला आहे.
‘चंद्रकांत पाटलांनी थेट बाळासाहेबांचा अपमान केलाय त्यामुळे आता भाजपसोबत मांडीला मांडी लावून बसलेल्या त्या 40 लोकांचे काय म्हणणं आहे? बाळासाहेबांचा अपमान करण्याची हिंमत आत्तापर्यंत कधी कुणी दाखवली नव्हती, तुम्ही गुलाम झाल्यामुळे किंवा भाजपने शिवसेना फोडल्यामुळे भाजपचे लोक सातत्याने बाळासाहेबांचा अपमान करत आहेत. हिंमत असेल तर मुख्यमंत्र्यांनी यावर प्रतिक्रिया द्यावी,’ असे राऊत म्हणाले.
उद्धव यांचे काय योगदान होते? – शेलार
‘चंद्रकांत पाटील यांचे हे वैयक्तिक मत आहे. त्यांना हे वक्तव्य टाळता आले असते. संपूर्ण रामजन्मभूमी अभियान, बाबरी ढांचा पाडणे ही कारसेवक हिंदू समाजाची उत्स्फूर्त प्रतिक्रिया होती. भाजपने याचं श्रेय घेतलं नाही आणि भविष्यातही कधी घेणार नाही. सकल हिंदू समाज एकत्र राहावा, ही 500 वर्षांपासूनची मागणी होती. आमच्या साधू संतांनी हे आंदोलन सुरु केलं होतं. त्यात संपूर्ण समाज जोडण्यासाठी समाजातील सर्व जण एकत्रित आले होते. त्यात महत्त्वाची भूमिका बाळासाहेब ठाकरे यांनी बजावली होती, त्याचा निश्चित फायदा झाला होता. बाळासाहेबांच्या या भूमिकेचा आम्ही सन्मान करतो. पण हा प्रश्न उपस्थित करणाऱ्या उद्धव ठाकरे यांना आमचा प्रश्न आहे की, तुमचं या अभियानात काय योगदान होतं?’ असा खोचक सवालही आशिष शेलार यांनी केला आहे.
Politics BJP Minister Chandrakant Patil Statement