मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भाजपचे नेते किरीट सोमय्या यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ खरा असल्याचे तपासातून निष्पन्न झाले आहे. तो व्हिडिओ कुणीही मॉर्फ केलेला नाही. त्यामुळे सोमय्यांच्या अश्लील कृत्यावर शिक्कामोर्तब झाला आहे. पण, तो व्हिडिओ लिक झाला कसा, सोशल मीडियावर कुणी व्हायरला केला, याचा शोध लावण्यात अद्याप पोलिसांना यश आलेले नाही.
ठाकरे गट, काँग्रेसमधील अनेक नेत्यांचे घोटाळे बाहेर काढणारे किरीट सोमय्या अश्लील चित्रफितीमुळे चांगलेच अडचणीत आले आहेत. त्यांच्या त्या व्हिडिओने भाजपची प्रतिमा मलीन होत आहे. विरोधक त्या मुद्द्यावरून भाजपला घेरण्याचा प्रयत्न करताहेत. विशेषत: विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी त्या व्हिडिओच्या कारणावरून सोमय्या आणि भाजपवर टीका करण्याची कुठलीही संधी सोडलेली नाही. अशात या प्रकरणाच्या तपासादरम्यान काही महत्त्वपूर्ण बाबी पुढे आल्या आहेत.
किरीट सोमय्या यांचा एक व्हिडिओ काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. या व्हिडिओ प्रकरणाचे पडसाद विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात उमटल्याचे पाहायला मिळाले. यासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले होते. ठाकरे गटातील आमदारांनी या व्हिडिओवरून किरीट सोमय्या यांच्याविरोधात गंभीर आरोप केले होते. आता हा व्हिडिओ खरा असल्याचे सांगितले जात आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या व्हायरल व्हिडीओ प्रकरणाचा तपास करणाऱ्या मुंबई पोलिसांच्या सूत्रांनी हा व्हिडिओ खरा असल्याचा दावा केला आहे. तपास पथकाकडून या व्हिडिओचे विश्लेषण करण्यात आले आहे. संबधित व्हिडिओ मॉर्फ केलेला नसून खरा असल्याचे आढळले आहे.
व्हायरल करणाऱ्याचा शोध सुरू
सोमय्या यांचा व्हिडिओ विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात मोठ्या प्रमाणावर चर्चेत आला होता. अधिवेशनातील गदारोळानंतर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले होते. त्यानुसार तपास सुरू आहे. व्हिडिओ कोणी व्हायरल केला याचा तपास गुन्हे शाखा करणार आहे.