मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ज्याप्रमाणे क्रिकेटच्या मैदानावर किंवा युद्धभूमीवर काय होईल? हे निश्चित सांगता येत नाही. तसेच राजकारणात देखील कोण किंवा कोणत्या पक्षाबरोबर जाईल आणि कोण सत्तेत येईल हे सांगणे आजच्या काळात कठीण झाले आहे, असे म्हटले जाते. याला कारण म्हणजे पहाटेच्या वेळी कोण कोणाबरोबर शपथ घेतो आणि दुसऱ्या व तिसऱ्या राज्यात जाऊन अनेक आमदार आणि मंत्री पक्षातून किंबहुना सरकारमधून बाहेर पडून वेगळ्याच पक्षाबरोबर सरकार स्थापन करतात, त्यामुळे सध्या काय घडेल, याबाबत आश्चर्य वाटण्याचे कारण नाही असे म्हटले जाते. भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपद स्विकारावे हा जसा राजकीय क्षेत्रासाठी धक्का होता तसाच तो फडणवीस यांच्यासाठीही होता. तशी कबुली फडणवीस यांनीच दिली आहे.
महाराष्ट्राचा राजकारणाबाबत गेल्या काही वर्षांपासून असे धक्कादायक प्रकार घडत आहेत, परंतु यामध्ये धक्कादायक काहीच नाही, असे विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. कारण एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचा प्रस्ताव सुद्धा मीच दिला होता. मी सरकारमध्ये नसेन, असेही ठरले होते. मात्र, केंद्रीय नेतृत्वाने आग्रह धरल्याने मी सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला, असेही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. यापूर्वी देखील फडणवीस यांनी नागपूर येथे या संदर्भात खुलासा केला होता.
दरम्यान, शिवसेना पक्षात फूट पडल्यानंतर आगामी सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील, असे सर्वांना वाटत होतं. मात्र, शेवटच्या क्षणी एकनाथ शिंदे यांच्याकडे मुख्यमंत्रीपद देण्यात आले, तर देवेंद्र फडणवीसांकडे उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी दिली. ऐनवेळी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचा मूळ निर्णय नेमका कुणाचा होता? हा प्रश्न अद्याप विचारला जात आहे. पण या प्रश्नाचे उत्तर उपमुख्यमंत्री फडणवीसांनी पुन्हा एकदा उत्तर दिले आहे.
ते म्हणाले की, एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो, एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवण्याचा निर्णय माझ्या सहमतीने झाला. यापुढे जाऊन मी असे म्हणेन की, एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचा प्रस्ताव माझाच होता. या प्रस्तावानंतर आमच्या वरिष्ठ नेत्यांनी याला मान्यता दिली. त्यामुळे एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करणे, हा माझ्यासाठी तरी धक्का नव्हता. ते आणखी पुढे म्हणाले, ‘ पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी अतिशय योग्य निर्णय घेतला. ज्या पक्षाने मला सर्वोच्च पदावर बसविले, त्या पक्षाचा आदेश माझ्यासाठी शीर्षस्थानी आहे. ‘
कारण राज्यात सत्तांतर घडत असताना सर्व घडामोडी क्रिकेटच्या एखाद्या वनडे सामन्याप्रमाणे घडत गेल्या. त्यामध्ये कधी काय निकाल लागेल, याचा अंदाज नव्हता. परिस्थितीनुसार गोष्टी बदलत गेल्या. तेव्हा शिवसेनेत एक उठाव झाला होता, ते बंड नव्हते . त्यातून ते आमच्यासोबत आले आणि आम्ही त्यांना मदत केली. आम्ही म्हटले असते, तर मुख्यमंत्रीपद आम्हाला मिळाले असते. पण, पदाची लालसा आम्हाला नव्हती. याउलट शिवसेनेचाच मुख्यमंत्री करु, हा निर्णय आम्ही आधीच घेतला होता ‘, असेही त्यांनी स्पष्ट केले. पण मी उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारावी, हा निर्णय माझ्यासाठी धक्का होता. आमच्या वरिष्ठ नेत्यांनी जेव्हा माझ्याशी चर्चा केली, तेव्हा ते या निर्णयावर ठाम होते. मुख्यमंत्री बनून माझे कर्तृत्व जेवढे वाढले असते, तेवढेच उपमुख्यमंत्री बनून माझे कर्तृत्व वाढले, आम्ही जे परिवर्तन केले, ते महाराष्ट्र आणि देशाच्या हिताचे आहे, जेव्हा तुम्ही असे परिवर्तन करत असता, तेव्हा तुम्हाला असे कठोर निर्णय घ्यावे लागतात. पण या निर्णयानंतर महाराष्ट्र आणि देशातून मला प्रचंड पाठिंबा मिळाला. कारण खरी शिवसेना आता आमच्यासोबत आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.
https://twitter.com/Dev_Fadnavis/status/1588876819196891137?s=20&t=MndNfSv5ALCLuYFvM_2ApQ
Politics BJP Leader Devendra Fadanvis on Shock