नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गुजरात विधानसभा निवडणुकीचे पडघम आता वाजू लागले आहेत. यंदा डिसेंबर महिन्यात ही निवडणूक होण्याची शक्यता आहे. त्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. विशेषतः भाजपने अतिशय तगडे नियोजन केले आहे. त्यामुळेच भाजपने केंद्रीय मंत्री, अन्य राज्यांचे मुख्यमंत्री, पदाधिकारी आणि सेलिब्रेटींची मोठी फौज मैदानात उतरविण्याचे निश्चित केले आहे.
सध्या गुजरातमध्ये भाजपची सत्ता असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे होम स्टेट असल्याने त्यांचे गुजरातकडे विशेष लक्ष असते. साहजिकच सुमारे अर्धा डझन वरिष्ठ नेते आणि अर्धा डझन केंद्रीय मंत्री अशी सुमारे दहा ते बारा जणांची फौज आतापासून निवडणुकीच्या प्रचारासाठी सज्ज झालेली दिसून येते. एकूण १८२ जागांसाठी दोन टप्प्यांत निवडणुका होण्याची शक्यता आहे.
या विधानसभा निवडणुकीची लवकरच घोषणा होणार आहे. सध्याच्या भाजपच्या राज्य सरकारचा कालावधी डिसेंबरमध्ये संपणार आहे. त्यापूर्वी निवडणुका होणार आहेत. निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीच गुजरातमधील राजकीय वातावरण तापले असून भाजप, काँग्रेस आणि आप पक्षाने जोरदार तयारी सुरू आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या वर्षी अनेकदा गुजरात दौरा केला असून अरविंद केजरीवालही वारंवार गुजरात दौऱ्यावर येत आहेत. त्यामुळे गुजरातमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
दरम्यान, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी या सध्या आजपासून ४ दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर असून आणंद येथे त्या भेट देणार आहेत. तसेच परराष्ट्र व सांस्कृतिक मंत्री मीनाक्षी लेखी या देखील गुजरात दौऱ्यावर आहेत येत्या चार दिवसात त्या व्यारा, निजार येथील दौरा करणार आहेत.
बी. एल. वर्मा, साध्वी निरंजन ज्योती, अजय भट्ट, भूपेंद्र यादव, आणि किरण रिजेजू हे देखील गुजरात दौऱ्यावर येणार असून ठीकठिकाणी जाहीर सभा मेळावे घेणार आहेत. त्यामुळे अहमदाबाद, मोडासा, अमरेली, भावनगर पंचमहाल, अरवल्ली, बाढ, पालीताना, पालनपुर आदि मतदारसंघातील वातावरण ढवळून निघणार आहे. दिवाळीपूर्वीच गुजरात मध्ये राजकीय क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर रणधुमाळी सुरू झाली असून दिवाळीनंतर राजकीय रणांगण आणखीनच तापणार असल्याचे दिसून येते.
Politics BJP Gujrat Election Strategy Campaign