मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यात सध्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचेही वारे वाहू लागले आहेत. अद्याप स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल तर काहीच ठरलेले नाही, पण तरीही मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांची भेट घेण्यामागचे गुपित काय, याची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे.
कधी भाजपच्या बाजुने तर कधी भाजपच्या विरोधात बोलणारे राज ठाकरे बरेचदा संभ्रम निर्माण करताना दिसतात. त्यांचा कल देवेंद्र फडणवीस सरकारच्या बाजुने आहे, असे वाटत असतानाच ते भाजपला आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला देतात. त्यामुळे त्यांची भूमिका काय आहे, हे कुणाच्याच लक्षात येत नाही. अलीकडेच त्यांनी कर्नाटकच्या निवडणुकीनंतर भाजपला आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला दिला होता. भाजपने आत्ताच चुका सुधारल्या नाहीत, तर त्यांची अवस्था काँग्रेससारखी होईल, असेही राज म्हणाले होते. अश्यात देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांची भेट घेतल्यामुळे दोघांमध्ये काय चर्चा झाली, याबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये ठाकरे सेना स्वतंत्र लढते की महाविकास आघाडीसोबत लढते, हे अद्याप निश्चित झालेले नाही. तसे झाल्यास एकाच विचारांचे ठाकरे सेना, शिंदे सेना, मनसे असे तीन पक्ष एकमेकांच्या विरोधात उभे ठाकतील. आणि त्याचा फायदा निश्चितच भाजपला होईल. त्यादृष्टीने आत्तापासून तयारी सुरू झाली आहे. सर्वच पक्षांमधील नेत्यांच्या भेटीगाठी सुरू झाल्या आहेत. त्यामुळे फडणवीस आणि राज ठाकरे यांची भेट पूर्णपणे राजकीय उद्देशानेच होती, असा दावा राजकीय वर्तुळात केला जात आहे.
भाजपचे मास्टर प्लानिंग
कर्नाटकातील पराभवानंतर भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी मास्टर प्लानिंग सुरू केले आहे. बुथ स्तरावर कामही सुरू केले आहे. परंतु, मोठ्या पातळीवर काही समीकरणे आवश्यक असतात. त्या दृष्टीने फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या भेटीकडे बघितले जात आहे.
म्हणून घेतली भेट
राज ठाकरे आणि मी चांगले मित्र आहोत. एक दिवस गप्पा मारुया असे ते म्हणाले होते. आणि या गप्पा राजकारण विहरीत होत्या. काल योग जुळून आला. आम्ही मनसोक्त गप्पा मारल्या असे म्हणत फडणवीसांनी या विषयाला बगल दिली आहे.
फडणवीस काय म्हणाले त्याचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे
https://twitter.com/Dev_Fadnavis/status/1663417269978800129?s=20
Politics BJP Devendra Fadnavis MNS Raj Thackeray Meet