मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा शिवसेना-भाजप युतीबाबत भाष्य करताना उद्धव ठाकरेंवर टिका केली आहे. खरे म्हणजे आम्ही युती करण्यास तयार होतो, पण शिवसेनेने केवळ ४ जागांसाठी युती तोडली, असा दावा फडणवीस यांनी केला आहे. त्यामुळे शिवसेनेने आमच्यासोबत बेईमानी केल्याने त्यांची जागा दाखवण्यात आली, अशी कठोर टीका फडणवीस यांनी केली आहे.
सध्या शिवसेना पक्षाचे नाव आणि पक्षचिन्ह गोठवल्याप्रकरणी केंद्रीय निवडणूक आयोगाविरोधात ठाकरे गटाने केलेली याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. हा ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे. आता दुसरीकडे, अमित शहा यांच्या मार्गदर्शनामुळेच आज महाराष्ट्रात भाजपा आणि बाळासाहेबांची शिवसेनेचे (शिंदे गट) सरकार सत्तेवर आहे, असे फडणवीस यांनी सांगितले.
राज्यात सुमारे साडेचार महिन्यापुर्वी शिवसेनेत उभी फुट पडून मोठी बंडखोरी झाली. शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांना घेऊन शिंदे गट निर्माण केला तसेच भाजपाने एकत्रित येऊन सत्तास्थापना केली. असा प्रकार अचानक कसा घडला ? यामागचा खरा सूत्रधार कोण ? असा अनेक चर्चा मधल्या काळात रंगल्या. याच संदर्भात आज उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी कबुली दिली. ‘विचार पुष्प’ पुस्तिकेच्या प्रकाशन समारंभात ते बोलत होते.
भाजपचे दिग्गज नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावरील सदर पुस्तक आहे. यावेळी शाह यांचे कौतुक करताना फडणवीस म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा निर्धार आणि अमित शाह यांच्या आत्मविश्वासामुळेच काश्मीरमधून कलम ३७० हटवण्यात यश आले. अमित शाहंच्या विचारात प्रगल्भता आहे. छत्रपती शिवाजी महाराज, वीर सावरकर आणि चाणक्य यांना मानणारे ते नेते आहेत. त्यांच्याकडे नेतृत्व क्षमता तर आहेच, पण निर्णय घेण्याची क्षमताही प्रचंड आहे.
राज्यात झालेला सत्ता बदल सर्वांनी पाहिला आहे. शिवसेनेच्या बेईमानांना त्यांची जागा दाखवण्यात आली. तसेच बाळासाहेबांची शिवसेना पुन्हा भाजपसोबत एकत्र आली. या परिवर्तन काळात एक नेता ताकदीने आपल्या पाठिशी होता. त्या नेत्यावर आज एक पुस्तक प्रकाशन होत आहे, असेही फडणवीस म्हणाले. सन २०१४ मध्ये मिळालेले यश मोदीजींचे नेतृत्व आणि अमित शाह यांच्या कर्त्तृत्वामुळे आहे. राजकारणातील चाणक्य ही उपमा याच निवडणुकीमुळे मिळाली. याच कार्यालयात अमित भाई राहायचे त्यांच्या जोरावर आपण निवडणूक जिंकली. त्याआधी शिवसेनेने केवळ ४ जागांसाठी युती तोडली. ११८ जागा लढणाऱ्या भाजपने २८८ जागा एका दिवसात लढण्याचा निर्णय घेतला, असा खुलासा केला.
LIVE | ‘विचार पुष्प’ या पुस्तकाचे प्रकाशन | मुंबई https://t.co/qB6tpDUm11
— Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) (@Dev_Fadnavis) November 15, 2022
Politics Bjp Devendra Fadanvis On Shivsena Alliance Breakup