मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सार्वजनिक ठिकाणी हिडीस अंगप्रदर्शन करत समाजमनावर विपरित परिणाम करणा-या उर्फी जावेदवर ,महिलांचा मान व सन्मान जपण्याची जबाबदारी असलेल्या महिला आयोगाने अद्याप स्वाधिकाराने दखल घेत कठोर कारवाई का केली नाही असा रोखठोक सवाल भाजपा महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी मुंबई कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत केला. गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेत भाजपा प्रदेश समन्वयक विश्वास पाठक, प्रवक्ते गणेश हाके, नांदेड जिल्हा महिला मोर्चा अध्यक्ष चित्ररेखा गोरे आदि उपस्थित होते. महिला आयोगाने या प्रकाराची दखल घेतली नसली तरी भाजपा उर्फीचा असा नंगानाच चालू देणार नाही असा इशाराही त्यांनी दिला.
श्रीमती वाघ म्हणाल्या की, उर्फीच्या कृत्याकडे दुर्लक्ष करणा-या महिला आयोगाने ट्वीटरवरील बातमीवरून मराठी वेबमालिका ‘अनुराधा’ च्या अश्लील पोस्टरची स्वाधिकाराने दखल घेत तातडीने अभिनेत्री तेजस्विनी पंडीत आणि दिग्दर्शक संजय जाधव यांना नोटीस बजावली. मात्र आयोगाला उर्फीचे कृत्य व्यक्तिस्वातंत्र्याचा भाग वाटते,यावरून आयोगाची दुटप्पी भूमिका स्पष्ट होते.
लेकीबाळींवर, महिलांवर लैंगिक अत्याचार होत असताना आपण ज्या समाजात राहतो त्याचे स्वास्थ्य जपण्याची गरज आहे. उर्फी सारखी महिला हे स्वास्थ्य बिघडवत असताना तिच्यावर कारवाई करण्यात आम्हाला वेळ वाया घालवायचा नाही हे महिला आयोगाचे वक्तव्य धक्कादायक आहे.
शरीराचे ओंगळवाणे दर्शन घडवणारे उर्फीचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असताना मूकदर्शकाचे काम करणा-या श्रीमती रुपाली चाकणकर यांना महिला आयोग अध्यक्षपदी बसण्याचा अधिकार नाही आणि उर्फी प्रमाणेच महिला आयोग देखील बेफाम झाला आहे अशी घणाघाती टीका श्रीमती वाघ यांनी केली. अपेक्षेप्रमाणे या प्रकरणाला राजकीय रंग चढवत धार्मिक तेढ निर्माण करण्याचा जो हीन प्रयत्न होत आहे तो निंदनीय आहे असेही श्रीमती वाघ यांनी नमूद केले.
सार्वजनिक ठिकाणी होणारे असे ओंगळवाणे अंगप्रदर्शन रोखण्यासाठी आणि छत्रपती शिवरायांची शिकवण, सावित्रीबाईंचे संस्कार जपण्यासाठी पक्षभेद विसरून सर्वांनी एकत्रित आवाज उठवण्याची गरज श्रीमती वाघ यांनी व्यक्त केली. कुणी सोबत येवो अथवा न येवो, समाजस्वास्थ्य जपण्यासाठी भाजपा विषय तडीस नेई पर्यंत लढायला सक्षम आहे असेही त्या म्हणाल्या.
भाषा नको तर कृती हवी..
सार्वजनिक ठिकाणी उघडंनागडं फिरणं हि आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे का ?
मुंबईतल्या भर रस्त्यात उर्फीच्या या शरीरप्रदर्शनाचं जे अतिशय बिभत्स आहे @Maha_MahilaAyog समर्थन करतंय का ?
आणि हो …कायदा कायद्याचं काम करणारंच महिला आयोग काही करणार की नाही ? pic.twitter.com/O0KSb9A5r7
— Chitra Kishor Wagh (Modi ka Parivar) (@ChitraKWagh) January 4, 2023
Politics BJP Chitra Wagh Actress Urfi Javed Women Commission