नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गौतम अदानी हिंडेनबर्ग अहवाल प्रकरणावरुन विरोधकांनी जेपीसीद्वारे चौकशी करण्याची मागणी केली आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आता वेगळी भूमिका घेतली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या समितीद्वारे चौकशी करावी, असे पवार यांनी म्हटले आहे. यासंदर्भात आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रीया दिली आहे.
बावनकुळे आज नाशिकमध्ये होते. यावेळी ते म्हणाले की, शरद पवार जे बोलले ते खरंच आहे. पवार यांनी जी भूमिका घेतली ती राष्ट्र म्हणून घेतली आहे. हिडनबर्ग सारख्या व्यवस्थेवर आपण विश्वास ठेवणार का अशी भूमिका पवार यांनी घेतली आहे. काँग्रेसने आरोप करायचे म्हणून त्यांच्यावर आरोप केले आहेत, असे ते म्हणाले.
मुख्यमंत्री शिंदेंच्या अयोध्या दौऱ्यावर
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांचे समर्थक मंत्री, आमदार व पदाधिकारी अयोध्येला गेले आहेत. याबद्दल बावनकुळे म्हणाले की, – शिवसेना म्हणजे एकनाथ शिंदे यांची आहे. उद्धव ठाकरे गट म्हणजे किंचित सेना आहे. किंचित सेनेने विरोध करण्याचे काही कारण नाही. तुम्ही पण जायला पाहिजे आणि आम्ही पण जातो. अयोध्येत राम मंदिर साकार होत आहे. हे 500 वर्षांपूर्वीचे स्वप्न पूर्ण होत आहे. त्यामुळे सन्मान केला पाहिजे, असे ते म्हणाले.
राज्यात आगामी निवडणुका पाहता मनसेशी युती करणार का, असा प्रश्न त्यांना विचारला असता ते म्हणाले की, स्थानिक पातळीवर आमचे नेते निर्णय घेतील. राज्य पातळीवर राज ठाकरे आणि मनसे आमचे चांगले मित्र आहेत, असे सांगून बावनकुळे यांनी युतीचे संकेत दिले.
Politics BJP Chief Bawankule on Sharad Pawar Adani Stand