ठाणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आणखी एक मोठा झटका बसला आहे. भिवंडी महापालिकेतील तब्बल १८ नगरसेवक एकाचवेळी अपात्र ठरले आहेत. यासंदर्भात राज्याच्या नगरविकास विभागाने आदेश काढले आहेत. या आदेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेससह महापालिकेच्या वर्तुळातही मोठी खळबळ उडाली आहे.
भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेच्या महापौर पदाच्या निवडणुकीत या १८ नगरसेवकांनी बंडखोरी केली. काँग्रेस पक्षाचा आदेश झुगारून या १८ नगरसेवकांनी काँग्रेस पक्षाच्या महापौर पदाच्या उमेदवार रिषीका रांका यांच्या विरोधात मतदान केले होते. त्यानंतर या सर्व १८ नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता.
याप्रकरणी भिवंडीचे माजी महापौर जावेद दळवी यांनी याचिका दाखल केली होती. या याचिकेवर नगरविकास विभागाने निर्णय दिला आहे. त्यानुसार, आदेश डावलून मतदान करणारे १८ नगरसेवक सहा वर्षांसाठी अपात्र करण्यात आले आहेत. या निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनाही मोठा झटका बसला आहे. कारण, आव्हाड यांनी या नगरसेवकांसाठी मोठी फिल्डींग लावली होती. पण त्यात त्यांना यश आलेले नाही.