बीड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अजित पवार गटाची बीडमधील सभा आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्शभूमीवर कायम लक्षात राहील अशी ठरली आहे. या सभेतून अजित पवार गटाचे शक्तीप्रदर्शन होण्यापूर्वी त्यांनी रोषच ओढवून घेतल्याचे दिसत होते. त्यामुळे सभेत जे काही झाले त्यावरून अजित पवार गटावरच चौफेर टीका होताना दिसत आहे.
बीडमधील सभा कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी आयोजित केली होती. या सभेतून शरद पवार यांच्यावर टीकेची झोड उठणार, हे निश्चित होते. पण त्याची सुरुवात धनंजय मुंडे यांनी केली. यावेळी त्यांनी शेरोशायरी करीत दाद मिळवली. शरद पवार यांच्यावर टीका केली पण भाषा सौम्य होती. त्यानंतर काहींची भाषणे झाली. पण मंत्री छगन भुजबळ यांचे भाषण सुरू झाले आणि गोंधळ सुरु झाला. त्यांनी भाषणातून शरद पवार यांच्यावर टीका केली. त्यामुळे सभेत बसलेले शरद पवार समर्थक, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भडकले आणि त्यांनी गोंधळ घालायला सुरुवात केली. त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या विनंतीला मान देऊन मांडवात थांबलेले लोक निघायला लागले. परिणामी भुजबळ यांनी दोनच मिनिटांत भाषण आवरते घेतले. त्यांच्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार भाषण करायला उठले तेव्हा ते शरद पवार यांच्यावर बोलतील, असे सर्वांना वाटत होते. मात्र भुजबळ यांच्या भाषणाने उडालेला गोंधळ लक्षात घेता अजित पवार यांनी मौन बाळगणेच योग्य समजले.
दादा शेवटी बोलले
अजितदादा पवार यांनी सभेच्या शेवटी भाषण केले. यावेळी त्यांनी मात्र शरद पवारांविरुद्ध कुठलेही भाष्य न करता दुष्काळी परिस्थितीवरच बोलणे पसंत केले. भुजबळांचे वक्तव्य, कार्यकर्त्यांचा गोंधळ यावर त्ांनी काहीही भाष्य केलं नाही.
जितेंद्र आव्हाडांची टीका
बीडकरांना सलाम! आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या विरोधात ऐकून घेणार नाही, ही तुम्हा बीडकरांची भूमिका होती; त्याबद्दल तुम्हांला मानाचा मुजरा!! ज्यांचं खाल्लं, प्यायलं… त्यांच्याच नावाने ओकाऱ्या काढत आहेत, अशी प्रतिक्रीया आव्हाड यांनी दिली आहे.
रोहित पवार म्हणाले
बीडमध्ये मोठं स्वागत झालं पण एका मंत्र्याने त्यासाठी सत्तेचा पुरेपूर वापर केला, हेही नजरेआड करता येणार नाही. या सभेत जेंव्हा आदरणीय पवार साहेबांच्या विरोधात एका मंत्र्याचे सूर निघायला लागले त्याला लोकांनीच विरोध केल्याने संबंधित मंत्र्याला दोन मिनिटांत आपलं भाषण गुंडाळावं लागलं. बाकी संपूर्ण सभेत जेंव्हा भाजपाची आरती गायली गेली तेंव्हा बारामतीप्रमाणेच स्वाभिमानी बीडकरांनीही एकही टाळी वाजवली नाही आणि खुर्च्याही रिकाम्या व्हायला लागल्या, यातच सर्व आलं…. कारण बारामती असो किंवा बीड… संपूर्ण महाराष्ट्रातील जनता हुशार आणि स्वाभिमानी आहे, हे पुन्हा एकदा स्पष्ट झालं.
Politics Beed NCP Chhagan Bhujbal Speech Stop Few Minutes
Ajit Pawar Dhananjay Munde Sharad Pawar