मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक विधानपरिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत सर्व पक्षाच्या मुख्य नेत्यांनी आपल्याला आधीच घडामोडींची माहिती असल्याचे संकेत दिले. पण, तरीही जाणीवपूर्वक राजकीय चित्र कसे बदलले, या धक्क्यातून अद्याप राजकीय वर्तुळ सावरू शकलेले नाही. देवेंद्र फडणवीस असो वा अजित पवार असो दोघांनाही काहीतरी वेगळे होणार, याची कल्पना होती. पण नेमके बाळासाहेब थोरात यांनाच कसे माहिती नव्हते, असा प्रश्नही उपस्थित होत आहे.
निष्ठावान नेते म्हणून काँग्रेसने डॉ. सुधीर तांबे यांना उमेदवारी दिली होती. मात्र, त्यांनी अर्ज भरणे टाळले. त्यांचा मुलगा सत्यजित तांबे यांनी ऐनवेळी अर्ज दाखल केला. या बंडखोरीनंतर तांबे पितापुत्राला पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. हे दोन्ही नेते महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष राहिलेल्या बाळासाहेब थोरात यांचे मेहुणे आणि भाचे आहेत. प्रचंड गदारोळानंतरही बाळासाहेब थोरात अद्याप माध्यमांसमोर आले नाहीत. मात्र, राजकीय खेळीतून भाच्याने मामाची गोची केल्याची चर्चा रंगली आहे. थोरात मौन असून त्याचेही अनेक अर्थ काढले जात आहेत.
नात्यातील ठिणगीचे कारण काय?
डॉ. सुधीर तांबेच नाशिक पदवीधर संघाचे विद्यमान आमदार आहेत. यावेळी त्यांचे पुत्र सत्यजित तांबे तिकीटासाठी इच्छूक होते. सक्रीय राजकारणात येण्याची त्यांची धडपड सुरु आहे. दुसरीकडे संगमनेर मतदारसंघात बाळासाहेब थोरातांची कन्या जयश्री थोरातसुद्धा राजकारणाचे धडे गिरवू लागली आहे. मामा-भाच्यात पडलेल्या ठिणगीचे मूळ संगमनेरच्या मतदारसंघातच असल्याची जोरदार चर्चा आहे. भाचा सत्यजित तांबेसुद्धा संगमनेरसाठी फिल्डिंग लावत असल्यामुळेच हा वाद उफाळून आल्याचा युक्तिवाद केला जात आहे.
राहुल गांधींसोबत निकटता
राहुल गांधी यांच्याशी घनिष्ठ संबंध आणि काँग्रेसचे कडवट समर्थक म्हणवणाऱ्या तांबे यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली आहे. गांधी आणि तांबे यांचा संपर्क इतका चांगला होता की नगर दौऱ्यावेळी राहुल गांधी यांनी तांबे यांच्या निवासस्थानी आवर्जून भेट दिली होती. मात्र आता तांबे पिता-पुत्राच्या निलंबनाचं फर्मान थेट हायकमांडकडूनच निघाले आहे.
Politics Balasaheb Thorat Keep Silence Satyajit Tambe