औरंगाबाद (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सुधीर मुनगंटीवार महाराष्ट्रातील भाजपचे एक ज्येष्ठ नेते आहेत. कमालीच्या क्षमतेमुळे भाजप-शिवसेना युती सरकारच्या काळात आणि नंतर २०१४ पासून आतापर्यंत मंत्रीमंडळात त्यांचा समावेश निश्चित राहिला आहे. वने, महसूल, अर्थ यासारखी महत्त्वाची खाती त्यांच्याकडे राहिलेली आहेत. पण मुनगंटीवार त्यांच्या कामाच्या शैलीसोबत रोखठोक विचार मांडण्याच्या बाबतीतही कायम चर्चेत असतात. आता तर त्यांनी आपल्याच पक्षाबद्दल विधान केले आहे.
सुधीर मुनगंटीवार कायमच आपल्या भाषणांमधून देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल कौतुकाच्या फैरी झाडत असले तरीही फडणवीस यांची निर्णयप्रक्रिया बरेचदा त्यांना आवडत नसल्याचे स्पष्ट दिसते. २०१४ मध्ये पक्षश्रेष्ठी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करतील असे लक्षात आले तेव्हा नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांनी राज्याचे नेतृत्व हाती घ्यावे, अशी विनंती करणारे मुनगंटीवार पहिले नेते होते. २०१९ मध्ये भाजप-सेनेची युती टिकावी यासाठीही त्यांनी बरेच प्रयत्न केले होते.
गेल्या वर्षी एकनाथ शिंदे भाजपसोबत सत्तेत सामील झाले तेव्हा मुनगंटीवार यांना मोठे खाते मिळण्याची आशा होती. पण त्यांच्या हाती वने आणि सांस्कृतिक खाते आले. यात भर म्हणून अजित पवारही सत्तेत सामील झाले त्यामुळे त्यांची नाराजी जाहीर होती. हीच खदखद त्यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये बोलून दाखवली. आपल्याला देशसेवा करणारा पक्ष आवडतो, शिंदे-पवार यांच्यासोबतचा भाजप आवडत नाही, असे त्यांनी जाहीरपणे बोलून दाखवले. यातून त्यांची अनेक दिवसांपासूनची खदखद जाहीर झाली.
नंतर सारवासारव
मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त १६ सप्टेंबरला होणाऱ्या कार्यक्रमाचा आढावा घेण्यासाठी मुनगंटीवार औरंगाबादमध्ये आले होते. त्यावेळी त्यांनी ही खदखद बोलून दाखवली. मात्र यातून वाद निर्माण होईल हे लक्षात येताच त्यांनी सारवासारव केली. ‘माझे वाक्य ट्विस्ट करू नका. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामुळेच शिंदे-पवार भाजपसोबत आले आहेत,’ या शब्दांत त्यांनी सारवासारव केली.
Politics Aurangabad Sudhir Mungantiwar BJP Statement