मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – देवेंद्र फडणवीस हे सीनियर उपमुख्यमंत्री आहेत. आणि आता अजितदादा यांच्यासारख्या ज्युनिअर उपमुख्यमंत्र्यांवर वचक ठेवण्यासाठी फडणविसांची सही लागणार आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी फडणवीस यांना टोला लगावला आहे. राज्य सरकारमध्ये अजितदादांच्या फाईल्स फडणविसांनी तपासून पुढे पाठवणे हा अजितदादांचा अपमान असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणविस-अजित पवार असे त्रिकुट सर्व कार्यक्रमांमध्ये राज्याचे नेतृत्व म्हणून एकत्र असले तरीही त्यांच्यातील धुसफुस पुढे आल्याशिवाय राहात नाही. मग ते अजितदादांनी शिंदेंच्या विभागाच्या बैठका घेणे असो वा फडणविसांनी अजितदादांच्या फाईल्स तपासणे असो, काहीतरी नक्कीच गडबड आहे, हे स्पष्ट आहे. विरोधकांसाठी हीच बाब अत्यंत महत्त्वाची असून त्यावरून आता सरकारला टोमणे मारण्याचा कार्यक्रम सुरू झाला आहे.
पूर्वाश्रमीचे भाजपचे नेते व वर्तमानात राष्ट्रवादीचे नेते असलेले एकनाथ खडसे यांनी ही संधी साधली असून तिघांमध्ये सुरू असलेल्या कोल्ड वॉरवर नेमकी टीका केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेल्या आदेशाला देवेंद्र फडणवीसांकडून स्थगिती म्हणजे एक प्रकारे अजितदादांची मानहानी करण्याचा प्रकार असल्याची टीका त्यांनी केली आहे. अजित पवार यांच्या अधिकारावर मर्यादा आल्यासारखे आहे. वित्तमंत्री म्हणून अजितदादांनी जे अधिकार घेतले त्यावर आता फडणीसांचे नियंत्रण राहील. त्यामुळं आता प्रत्येक फाईल ही फडणवीसांकडे जाईल त्यानंतर ती मुख्यमंत्र्यांकडे जाईल असा टोलाही खडसेंनी लगावला.
नाशिकमध्येही रस्सीखेच
गिरीश महाजन आणि दादा भुसे यांच्यात नाशिकच्या पालकमंत्रीपदावरून जोरदार रस्सीखेच सुरू असल्याचेही खडसे म्हणाले. शिंदे-फडणवीस-पवार सरकारमधील मतभेद उघड आहेत, असे सांगत गिरीश महाजन यांचा जळगाव जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावर डोळा होता, पण आपल्या वाट्याला ते येणार नाही, याचा अंदाज आल्यामुळे त्यांनी लगेच दिशा बदलली, असेही खडसे म्हणाले.
Khadse says, this is an insult to Ajitdada !
Politics Ajit Pawar State Government Insult Critic
Eknath Khadse NCP Shinde Fadanvis