मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची महाविकास आघाडी असली तरीही संजय राऊत ‘सामना’मध्ये लिहीताना हात आखुडते घेताना दिसत नाहीत. त्यामुळे राष्ट्रवादी त्यांचा मित्रपक्ष असला तरीही त्यांनी अद्याप अजित पवार यांच्यावरील टीका थांबविलेली नाही. पण त्यावर आता अजित पवार यांनी संजय राऊत यांना उत्तर दिले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काहीतरी गडबड होणार आहे, याची केवळ चुणचुण लागलेली असतानाच संजय राऊत यांनी तलवार उगारून अजित पवार यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यामुळे अस्वस्थता वाढलेली होती. दरम्यान, अनेक घडामोडी घडल्या आणि आता अजित पवार आपल्या समर्थित आमदारांसह भाजपमध्ये जाणार आहेत, असे पूर्ण चित्र असतानाच शरद पवार यांनी राजीनामा दिला. त्यामुळे सगळाच फोकस बदलला. यात अजित पवार यांची कोंडी झाल्याचे विश्लेषण करण्यात आले.
शरद पवार यांच्या राजीनाम्याचा विषय संपलेला आहे, असे राष्ट्रवादीकडून वारंवार सांगण्यात आल्यानंतरही अद्याप त्यावरचे राजकारण थांबलेले नाही. पण यातच संजय राऊत यांनी ‘सामना’मध्ये अग्रलेख लिहून अजित पवार यांना पुन्हा एकदा डिवचले. राष्ट्रवादी काँग्रेसमधील एक गट भाजपमध्ये जाण्याचा बॅगा भरून तयार असल्याचे भाष्य संजय राऊत यांनी अग्रलेखातून केले आहे.
ईडी, सीबीआयसह इतर तपास यंत्रणांच्या भीतीपोटी राष्ट्रवादी काँग्रेसमधील एक गट भाजपाबरोबर जाण्याच्या तयारीत होता. पण शरद पवारांनी राजीनामा देत बंडखोरीची योजना हाणून पाडली, अशा आशयाची टीका संजय राऊतांनी अग्रलेखातून केली. त्यावर अजित पवार यांना प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी या मताला फार महत्त्व देण्याची गरज नाही, असे म्हटले आहे. ‘एखादी व्यक्ती मनाला वाटेल तसे काहीही बोलत असेल तर त्यांच्या मताला महत्त्व देण्याचे काहीही कारण नाही. ते त्यांचं वैयक्तिक मत आहे. त्यांचं मत म्हणजे महाराष्ट्रातील जनतेचं मत असू शकत नाही,’ असे प्रत्युत्तर अजित पवार यांनी दिले आहे.
जेवढी माणसं तेवढी मतं
त्यांनी अग्रलेखातून त्यांचं मत मांडलं आहे. ते वैय्यक्तिक मत आहे, महाराष्ट्राच्या जनतेचं नाही. राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी एकदा सांगितल्यानंतरही जर त्यांना मनाला वाटेल ते बोलायचं असेल, तर त्याला महत्त्व देण्याची गरज नाही. जेवढी माणसं तेवढी मतं असू शकतात, असेही अजित पवार म्हणाले. ते साताऱ्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.
Politics Ajit Pawar Reaction on Sanjay Raut