मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अजित पवारांनी त्यांच्या काकांशी फारकत घेत स्वत:ची वेगळी चुल मांडली आहे. तर अजित पवारांचे पुतणे रोहित पवार मात्र अजूनही सीनिअर पवार अर्थात शरद पवारांसोबत आहेत. अशात अजितदादा आणि रोहित यांच्या भेटीने नव्या चर्चेला उधाण आले आहे. पावसाळी अधिवेशनादरम्यान या ज्युनिअर पवार काका-पुतण्याच्या भेटीत कुठलीही राजकीय चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. तरीदेखील अर्धा तास चाललेल्या दोघाच्या या भेटीत नेमके काय शिजले, याबाबत गुप्तता पाळण्यात येत आहे.
रोहित पवार हे शरद पवार यांचे राजकीय वारस समजल्या जात आहेत. भविष्यात पक्षाची धुरा कुणा युवाहाती द्यायची असल्यास रोहित यांच्या नावाचा विचार सर्वात आधी होणार आहे. रोहित यांनीदेखील वेळोवेळी आंदोलने करून नागरिकांशी संपर्क कायम ठेवला आहे. अगदी जिल्हा परिषदेच्या सदस्यापासून त्यांनी स्वत:चे करिअर सुरू केले आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी अधिवेशनादरम्यान कर्जत-जामखेड या त्यांच्या मतदारसंघात एमआयडीसी व्हायला हवी, अशी मागणी करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. त्यानंतर आता त्यांनी अजित पवार यांची भेट घेतल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
राजकीय मतभेद पण कौटुंबिक संबंध जपणार
स्पर्धा परीक्षेसाठी १००० रुपये घेतले जातात, याबाबत उपमुख्यमंत्र्यांना माहिती दिली. राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये ६०० रुपये भरले की कितीही वेळा परीक्षा देता येते. तशाच पद्धतीने आपल्याकडे राबवावी, यासाठी दादांशी चर्चा केली. एमपीएससीसाठी पाठपुरावा घेतला, लक्ष घालण्याची विनंती केली. पिक विमा भरताना इंटरनेट डाऊन असल्याने अनेकांना विमा भरता आला नाही, त्यात मुदत वाढवण्याची मागणी केली. या सरकारमध्ये एकमेव अजित दादा असे आहेत. जे काम मार्गी लावू शकतात. आम्ही एकत्र जेवण केले. राजकीय मतभेद आहेत. पण, कौटुंबिक संबंधात ते येऊ नयेत, याची आम्ही काळजी घेतो. या भेटीत आमच्यात कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही, असे या भेटीनंतर रोहित पवार म्हणाले.