पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अधिकारांवर गदा आणत असल्याची चर्चा होत आहे. मुख्यमंत्र्यांच्या वॉररूमला उत्तर म्हणून दादांनी प्रोजेक्ट मॉनिटरिंग युनिट सुरू केल्याचे म्हटले जात आहे. यावरून गेल्या काही दिवसांपासून राज्यात अधिकारांवरून कोल्डवॉर सुरू आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यात बोलताना अजितदादा पवार चांगलेच भडकले.
एकीकडे स्वातंत्र्यदिनी कोण कुठे ध्वजारोहण करणार यावरून जुंपलेली असताना दुसरीकडे अधिकारांचा संघर्ष सुरू झाला आहे. अशात आता दादांनी मीही अर्थमंत्री आहे. बैठका घेण्याचा, माहिती घेण्याचा अधिकार मलाही आहे. त्यामुळे मी बैठका घेतो. मात्र, काही निर्णय वगैरे गोष्टी असतील तर मुख्यमंत्र्यांचाच शब्द अंतिम असतो. त्यामुळे ‘कोल्ड वॉर’ सुरू आहे, यात तथ्य नाही असे म्हटले आहे.
पुण्यातील विधानभवनात झालेल्या बैठकीनंतर पवार यांनी पत्रकारांबरोबर संवाद साधला. नवाब मलिक यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला, ते आता कोणाकडे आहेत कसे समजायचे, या प्रश्नावर त्यांनी बोलणे टाळले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील विविध प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी वॉर रूम स्थापन केली आहे. या वॉर रूममध्ये मुख्यमंत्री नसताना अजित पवार यांनी सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेतली. अर्थमंत्री म्हणून बैठका घेण्याचा मला अधिकार आहेच, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
पालकमंत्रीपदाचा वाद नाही
पालकमंत्रिपदाचा कसलाही वाद नाही. पुण्यातील ध्वजवंदन राज्यपालच करत असतात, असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार माध्यमांच्या प्रतिनिधींवरच संतापले. राज्य सरकारनेच पत्रक काढून पुण्याचे ध्वजवंदन पालकमंत्री चंद्रकात पाटील करणार, असे जाहीर केल्याचे सांगूनही त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर डोळा ठेवायला आम्ही दोघे (अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस) मुर्ख आहोत का,’ असा सवाल करीत ‘मुख्यमंत्र्यांत आणि माझ्यात कोणताही वाद नाही,’ असे पवार यांनी स्पष्ट केले.
Politics ajit pawar NCP Rights Question Angry
Pune DYCM Eknath Shinde CM Cold War