मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अजित पवार यांना अर्थखाते मिळू नये, अशी मागणी शिवसेनेने केली होती. दादांना अर्थखाते मिळाले आणि त्यांनी सर्व मलिदा पश्विम महाराष्ट्राकडे वळविण्याचे प्रयत्न केले तर पुन्हा बंडा होईल, असा इशारा आमदार अॅड. आशिष जयस्वाल यांनी दिला होता. त्यानंतरही दादांना अर्थ विभाग मिळाला आहे. त्यामुळे प्रचंड विरोध करणाऱ्या शिवसेनेचे टेन्शन वाढले आहे.
दोघात तिसरा आणि सारं काही विसरा म्हणत अजित पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीचे आमदार सत्तेत सहभागी झाले आहेत. राष्ट्रवादीत केलेले हे बंड अजित पवार आणि त्यांच्यासोबत आलेल्या सहकाऱ्यांना फळले आहे. सर्वांना तगडी मंत्रिपदे मिळाली आहे. त्यातल्या त्यात अजितदादांना हवे असलेले अर्थ खाते मिळाले आहे. दादांना अर्थखाते मिळू नये, यासाठी प्रचंड विरोध होऊनही तेच खाते त्यांच्या पदरी पडल्याने आता शिवसेनेची चांगलीच गोची झाली आहे.
मुख्य म्हणजे राष्ट्रवादीच्या इतर आमदारांनाही चांगली सहकार, कृषी, महिला व बालकल्याण आदी चांगली खाती मिळाली आहे. त्यामुळे आता सत्तेच्या ट्रिपल इंजिनमध्ये कुरबुर सुरू झाली आहे. अशातच अजितदादांना अर्थ खाते देत असतानाही त्यांना फारसे अधिकार राहणार नसल्याचे सांगण्यात येत आहे. अजित पवारांना अर्थखाते मिळालेले असले तरी त्यांना तेवढे स्वातंत्र्य नसणार आहे. अजित पवारांनी घेतलेले निर्णय आधी फडणवीसांकडे आणि त्यानंतर शिंदेंकडे जाणार आहेत. त्यानंतर त्यावर शिक्कामोर्तब केले जाणार आहे. यामुळे पुढे होणारे मतभेद टाळता येतील, असा प्रयत्न शिंदे, फडणवीसांचा आहे. याचे संकेतही मंत्री दिपक केसरकर यांनी दिले आहेत.
अजित पवारांनी काहीही निर्णय घेतला तरी अंतिम निर्णय मुख्यमंत्र्यांकडे असणार आहे, असे केसरकर यांनी म्हटले आहे. अजित पवारांनी जी अडचण होती ती समजून घेतली, यामुळे ते जो निर्णय घेतील तो सर्वांसाठी चांगला असेल, असे केसरकर म्हणाले.
भाजप, शिवसेनेच्या खात्यात कपात
शिंदे-फडणवीस-पवार सरकारचे खातेवाटप जाहीर करण्यात आले. या खातेवाटपात भाजप आणि शिवसेना शिंदे गटाकडे असलेली काही खाती राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांना देण्यात आली. शिवसेना शिंदे गटातील स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अब्दुल सत्तार, दादा भुसे आणि संजय राठोड यांच्याकडील एकेक खाते कमी करण्यात आले असून, ते खाते राष्ट्रवादी काँग्रेसला देण्यात आले आहे.