औरंगाबाद (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये सुरू असलेला वाद महाराष्ट्रासाठी आता नवीन राहिलेला नाही. पण आता हा वाद या दोघांच्या वारसदारांपर्यंत येऊन पोहचला आहे. त्यामुळे आता ठाकरे – शिंदेंची पुढची पिढी म्हणजेच आदित्य ठाकरे आणि डॉ. श्रीकांत शिंदे राजकारणात आमनेसामने येणार आहे. एकाच दिवशी एकाच मतदारसंघात ही दोन्ही युवा नेते शक्तिप्रदर्शन करणार असल्याने मोठा पेच निर्माण झाला. सतत चर्चेत असणारे अब्दुल सत्तार यांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या सिल्लोडमध्ये हा सामना रंगणार होता. मात्र, ठाकरेंना परवानगी नाकारत शिंदेंना परवानगी देण्यात आली आहे.
एकनाथ शिंदे यांनी ४०पेक्षा अधिक आमदार सोबत नेत शिवसेनेत बंडखोरी केली. तेव्हापासून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यातील वाद पाहायला मिळतोय. दोन्ही नेते एकमेकांवर टीका करण्याची कोणतीही संधी सोडत नाही. परंतु या दोन्ही नेत्यातील वाद आता वारसदारांपर्यंत येऊन पोहचला आहे. सिल्लोड येथील सभेत उद्धव ठाकरेंचे पुत्र आदित्य ठाकरे मेळावा घेणार आहेत, तर त्याच दिवशी सिल्लोडमध्येच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांची सुद्धा सभा होणार आहे. त्यामुळे या दोन्ही युवराजांपैकी कोण मैदान मारणार हे पाहणे महत्त्वाचं ठरणार होते. मात्र, ठाकरेंना परवानगी नाकारण्यात आली आहे.
गेल्या काही महिन्यांपासून ठाकरे कुटुंबावर सतत टीका करणाऱ्या अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोड मतदारसंघात ७ नोव्हेंबरला आदित्य ठाकरे मेळावा घेण्याचे नियोजित होते. आदित्य ठाकरे यांच्या मेळाव्याची घोषणा होताच अब्दुल सत्तार यांनी देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांची सुद्धा त्याच दिवशी सिल्लोडमध्ये सभा होणार असल्याची घोषणा केली. त्यामुळे आता दोन्ही गटाकडून आपापल्या नेत्याच्या सभेला गर्दी जमवण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. त्यामुळे आदित्य ठाकरे यांच्या सभेला की श्रीकांत शिंदे यांच्या सभेला अधिक गर्दी असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले. आता मात्र, शिंदेंच्या मेळाव्याला परवानगी देऊन सत्तार यांनी वेगळी खेळी खेळल्याचा आरोप ठाकरे गटाने केला आहे.
Politics Aditya Thackeray Melava Permission Reject