मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर १६ आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा तापलेला आहे. विधानसभा अध्यक्ष काय निर्णय घेणार याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले आहे. दरम्यान, या मुद्दयावर संजय राऊत यांनी आमच्या विरोधात केलेली वक्तव्येच पुराठा ठरणार असल्याचा गुगली राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी केले आहे.
आमदारांच्या अपात्रतेच्या अर्जावर विधानसभा अध्यक्ष आम्हाला नोटीस बजावणार आहेत, त्याला आम्ही आम्हाला झालेल्या त्रासाची कैफियत लेखी मांडणार आहोत. संजय राऊतांनी आमच्याविरोधात जी काही वक्तव्ये केली आहेत, त्याचे पुरावे आम्ही जोडणार आहोत. राऊतांविरोधात हक्कभंगाबाबत आम्ही सुमोटो घेऊन कारवाईची मागणी करणार आहोत. येत्या काळात शिवसेनेत मोठ्या प्रमाणात इनकमिंग होईल, मी त्यावर आताच सांगत नाही, असे देसाई म्हणाले.
आदित्य ठाकरे हे आपली खंत राज्यपालांकडे व्यक्त करत असतील. जे त्यांना जमलं नाही ते आता आम्ही करत आहोत. मुंबईचा विकास हा त्यांना पहावत नसेल, त्यांना जो आक्षेप आहे तो त्यांनी लेखी मुख्यमंत्र्यांना द्यावा. संजय राऊत हे विश्वप्रवक्ते आहेत जगाच्या पाठीवर काहीही घडले की ते नाक खुपसतात, अशी टीका देसाई यांनी केली.
वर्धापनदिन शिंदे गटाचाच
शिवसेनेचा वर्धापन दिन हा शिंदे गटच साजरा करणार असल्याचे, राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांनी सांगितले. याचबरोबर मुंबई महापालिकेवर महापौर हा युतीचाच बसेल, असा विश्वास देसाई यांनी व्यक्त करतानाच १६ आमदारांच्या अपात्रतेवरील कारवाईविरोधात शिंदे गटाची रणनिती काय असेल ते देखील सांगितले आहे.
जलसाठे शंभर टक्के भरतील
जलयुक्त शिवार टप्पा २ ही योजना मागच्या सरकारने थांबवल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. याचाच आढावा आम्ही काल घेतला यात मुख्यमंत्रीही व्हिसीद्वारे सहभागी झाले होते. गाळ मुक्त धरण, गाळमुक्त शिवार हे आज पासून राबवणार आहोत. हा गाळ गायरान व पडीक जमिनींवर टाकला जाणार आहे. यामुळे जमिन सुपिक होईल आणि जलसाठे १०० टक्के भरतील असे नियोजन असल्याचे देसाई म्हणाले.
Politics 16 MLA Disqualification Shinde Group Strategy