सुदर्शन सारडा, नशिक
गणेशोत्सव हा राज्याच्या अस्मितेचा उत्सव असतो. त्याला मोठी परंपरा आहे.दहा दिवस घराघरात उत्साहाला उधाण आलेला असतो. थोरांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्याच अध्यात्मिक अस्मिता यानिमित्ताने ओसंडून वाहत असतात. राज्यात गणेशोत्सवची सांगता अभूतपूर्व उत्साहात संपन्न होत असताना बाप्पांच्या विसर्जनाच्या पूर्वदिनी राज्यातील राजकरणात नेत्यांच्या मुखातून बघायला मिळालेली क्लिष्टता राजकीय कर्माला कलंक फासणारी ठरावी असाच काहीसा प्रकार सोमवारी घडला. राज्यातील काही नेत्यांनी त्यांच्या विरोधकांवर टीका करताना घसरलेल्या जीभेचा उच्चांकाच्या यादीत पहिल्या तीन मध्ये समावेश म्हणता येईल.
राज्यातील विधानसभा निवडणुका जसजशा नजरेत येतात तसा काही नेत्यांच्या जीभेचा तोल सुटताना दिसतो. याच नेत्यांच्या लपलेल्या राजकीय स्वार्थाला सिध्द करण्याचे धाडस ‘आपण हे काय बोलून बसलो’ यावर होणाऱ्या आत्मचिंतनाला ही हीच नेते मंडळी केराची टोपली दाखवतात हीच खरी शोकांतिका आहे. ज्या तीन टीका सोमवारी चर्चेत राहिलेल्या त्यातील संजय गायकवाड यांनी आपल्या जिभेला ढील देत जीभ काढणाऱ्याला अकरा लाखांचा लावलेला इनाम बेतालपणाची साक्ष देतो. शिवसेनेच्या राजकीय वलयात अनेक सामान्य लोकं मोठ्या पदांवर पोहोचली त्याचेच एक उदाहरण म्हणजे हे संजय गायकवाड होय. त्यांनी राहुल गांधींबद्दल केलेल्या वक्तव्याबाबत निषेध नोंदवला गेला पण त्यांच्या मुखातून पडलेले ते वाक्य त्यांच्यातील राजकीय श्रीमंतीची अनोखी पेशकेशच म्हणावी. दुसरे आमदार संजय शिरसाठ यांनी निष्ठा आणि विष्ठा यावर निर्विकार बोलत आपल्यातली राजकीय संस्कृती विशद केली.ठाकरे ब्रँडमुळे नावारूपास आलेल्या शिरसाठ यांनी राजकीय आयुष्याला आकार देणाऱ्या मुर्तीवर सोडलेले बाण भलेही टीआरपी वाढवून गेले असेलही पण यातून त्यांनी केलेली असभ्यतेची टीका त्यांच्यावरच उलटल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.
आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्यावर जहरीपणाचा वार केला. तोही राज्याच्या राजकारणाला अरूचक आहे. जेवढे पडळकर यांचे वय आहे तितकी पवारांची राजकीय कारकीर्द आहे.पवारांनी राजकारणात निर्णय घेताना संकोच दाखवला असेलही पण याला ठरवणारी माय बाप जनता असताना पडळकर यांनी परस्पर गरळ ओकने किती योग्य आहे हे वरचे नेतेच जाणो.हेच गोपीचंद पडळकर बारामतीतून अजित पवारांचे प्रतिस्पर्धी होते हे कसे विसरून चालेल?
या तिघांनीही केलेल्या टीकेला विरोधकांनी उत्तरही दिले.पण अशा टीका झाल्याच नसत्या तर ऐन गणेशोत्सवात मतदारांचे अशा वैचारिक फंद्यात जाणे टळले असते.
महाराष्ट्राच्या राजकारणाला मोठा इतिहास आहे. हेच राज्य सार्वभौम घडवताना त्या त्या वेळच्या नेत्यांनी दिलेले योगदान आजही ग्राह्य धरले जाते. त्याकाळी टीका होतही होत्या पण राजकीय संस्कृतीला डाग लावला गेला नाही. राजकारणात नेत्यांच्या अपेक्षा काहीही असो त्यातील अजातशत्रू बाणा जपला गेला पाहिजे यासाठी खरे प्रयत्न होणे गरजेचे आहे. दोन महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभेच्या निवडणुका समोर दिसत असल्याने यंदाच्या गणेशोत्सवाला अनन्य महत्व प्राप्त झाल्याचे दिसले. जसे पक्ष वाढले तसे काही ठिकाणी एका गल्लीत तीन तीन मंडळ उत्सव साजरा करताना दिसले त्याला गालबोट कुठेही लागले नाही मात्र देखावे पाहताना नागरिकांना फ्लेक्स पाहताना मात्र कन्फ्युज व्हावे लागले. अनंत चतुर्दशीला गणपती विसर्जन संपन्न होईल. त्यानंतर राजकारणाच्या आखाड्यात असली खेळ खेळला जाईल.यासाठी राजकीय सभ्यता आणि संस्कृती जपणे गरजेचे आहे. म्हणूनच गणरायाच्या विसर्जनाबरोबरच राजकीय अ-सभ्यताही विसर्जित होवो इतकीच माफक अपेक्षा सर्वसामान्य नागरिकांची आहे.