नवी दिल्ली – सर्वसामान्यांनी कर्जासाठी अर्ज केला तरी त्यांना वारंवार बँकेत खेटा माराव्या लागतात. तसेच, सामाजिक कार्यासाठी निधी मिळावा म्हणून विविध संस्था या अनेक कंपन्या आणि मान्यवरांचे उंबरटे झिजवतात. मात्र, त्यांना काही पान्हा फुटत नाही. याउलट स्थिती राजकीय पक्षांची आहे. न मागताच त्यांना कोट्यवधीचे दान मिळते.
देशातील राजकीय पक्षांना निवडणुकीदरम्यान कुठून किती निधी मिळतो आणि किती खर्च होतो, मिळालेला निधी कसा खर्च होतो, यावर कोणाचे लक्ष किंवा नियंत्रण असते का, हे प्रश्न सर्वसामान्यांना नेहमीच पडत असतात. परंतु अनेक स्वयंसेवी संस्था यावर अभ्यास करत असतात. त्यांच्या अहवालातून अनेक गोष्टींचा उलगडा होतो. या वर्षी पाच राज्यांतील विधासभा निवडणुकांमध्ये राजकीय पक्षांना किती निधी मिळाला आणि तो कसा खर्च झाला याबाबत एका अभ्यासात उलगडा झाला आहे.
सन २०२१ मध्ये झालेल्या पाच राज्यांच्या आणि केंद्रशासित प्रदेशात भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेससह १९ राजकीय पक्षांनी विधानसभा निवडणुकीदरम्यान १,१०० कोटी रुपये कमविले आहेत. त्यादरम्यान या पक्षांनी ५०० कोटी रुपयांपेक्षा अधिक पैसे खर्च केले होते. त्यामधील मोठा हिस्सा स्टार प्रचारकांच्या जाहिराती आणि प्रवासावर खर्च करण्यात आला होता. एका अभ्यासात ही माहिती समोर आली आहे.
आसाम, केरळ, तामिळनाडू, पश्चिम बंगाल आणि पुद्दुचेरी विधानसभा निवडणुकीदरम्यान भाजपला सर्वाधिक ६११.६९ कोटी रुपये मिळाले. त्यापैकी पक्षाने २५२ कोटी रुपये खर्च केले. असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआर) आणि नॅशनल इलेक्शन वॉचच्या एका अहवालानुसार एकूणच भाजपने मीडियामध्ये जाहिरातींसह प्रचारावर ८५.२६ कोटी रुपये आणि स्टार प्रचारकांच्या आणि इतर नेत्यांच्या प्रवासावर ६१.७३ कोटी रुपये खर्च केले आहेत.
काँग्रेसला १९३.७७ कोटी रुपये प्राप्त झाले. पक्षाने ८५.६२ कोटी रुपये खर्च केले. त्यामध्ये प्रचारावर ३१.४५ कोटी रुपये आणि प्रवासावर २०.४० कोटी रुपये खर्च केल्याचा समावेश आहे. द्रविड मुन्नेत्र कळघम (द्रमुक) हा पक्ष तिसर्या स्थानावर राहिला. पक्षाला १३४ कोटी रुपये मिळाले. द्रमुकने एकूण ११४.१४ कोटी रुपये खर्च केले. पक्षाने प्रचारावर ५२.१४४ कोटी आणि स्टार प्रचारक, इतर नेत्यांच्या प्रवासासाठी २.४१ कोटी रुपये खर्च केले.
अहवालानुसार, निवडणुकीदरम्यान मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी (माकपा) ला एकूण ७९.२४ कोटी रुपये, तृणमूल काँग्रेलला ५६.३२ कोटी, अण्णा द्रमुक पक्षाला १४.४६ कोटी रुपये आणि भारतीय कम्युनिस्ट पार्टीला (भाकपा) ८.०५ कोटी रुपये मिळाले. आसाम, केरळ, तामिळनाडू, पश्चिम बंगाल आणि पुद्दुचेरी विधानसभा निवडणुकीदरम्यान २०२१ मध्ये १९ राजकीय पक्षांना १,११६.८१ कोटी रुपये मिळाले होते. त्यापैकी एकूण ५१४.३० कोटी रुपये खर्च झाले आहेत.