मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गेल्या अनेक वर्षांपासून हनुमान जयंती साजरी होत असली तरी यंदाची जयंती मात्र काही खासच होती. कारण, राजकीय नेत्यांनी या जयंतीमध्ये सहभाग घेतल्याने मोठे वलय प्राप्त झाले. त्यामुळेच सर्वसामान्यांना हा प्रश्न पडला आहे की, हनुमान जयंतीचा अचानक नेत्यांमध्ये फिव्हर का चढला, बजरंगबली या नेत्यांना पावणार का
बघा विविध नेत्यांचे हनुमान जयंतीचे हे फोटो
संपूर्ण देशात आज हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्वतः सायंकाळी पुण्यातील खालकर चौकातील मारुती मंदिरात श्रीहनुमानाची महाआरती केली.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या व खासदार सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री अझित पवार यांनी कर्वेनगर, पुणे येथील मंदिरात जाऊन श्री हनुमान जयंतीच्या निमित्ताने मारुतीराया आणि विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेऊन आरती केली.
युवा सेनेचे अध्यक्ष आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी लोअर परेलमधील श्री खडा हनुमान मंदिरात दर्शन घेतले. यावेळी नारायण मिल गल्ली मित्रमंडळ यांच्यातर्फे आयोजित हनुमान जयंतीउत्सवात सहभाग घेतला. शिवसेनेच्या प्रयत्नाने सिपी टॅंक माधव बाग येथे श्री संकट मोचन हनुमान मंदिराचा जीर्णोद्धार करून मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना झाली. हनुमान जयंतीनिमित्त स्थानिकांसह या मूर्तीची प्रथम पूजा ठाकरे यांनी केली. लोअर परेलमधील श्री हनुमान सेवा मंडळ आयोजित श्री हनुमान जन्मोत्सवात आणि सत्यनारायण महापूजेत सहभाग आणि दर्शन घेतले. वरळी बीडीडी येथेही श्री हनुमान जन्मोत्सवात त्यांनी सहभाग घेतला.