नवी दिल्ली – भारताच्या विकासासाठी वाहन मोडित काढण्याचे धोरण (Vehicle Scrappage Policy) खूपच महत्त्वाचे आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी म्हटले आहे. या धोरणाला त्यांनी कार्यान्वित केल्यानंतर त्यांनी ही माहिती ट्विटरवर दिली. या कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी युवकांसह स्टार्टअपना केले आहे.
मोदी म्हणाले, की या धोरणामुळे युवकांना नोकरी मिळून स्टार्टअपना व्यवसायाची संधी उपलब्ध होणार आहे. वाहने भंगारात काढण्याच्या धोरणामुळे प्रदूषण पसरविणार्या वाहनांना टप्प्याटप्प्याने मागे घेण्यास मदत मिळणार आहे. पर्यावरणावर अनुकूल परिणाम होऊन प्रदूषण पसरविणार्या वाहनांना हटविता येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी गांधीनगर येथे होणार्या इन्वेस्टर्स समिट फॉर व्हिकल स्क्रॅपिंग इन्फ्रास्ट्रक्चर दरम्यान राष्ट्रीय वाहन मोडित काढण्याच्या धोरणाला कार्यन्वित करणार आहेत, अशी माहिती केंद्रीय रस्ते परिवहन वाहतूक मंत्री नितीन गडकरी गुरुवारी गांधीनगरला दिली होती.
काय आहे धोरण
या धोरणानुसार, १५ ते २० वर्षे जुन्या वाहनांना भंगारात काढण्यात येणार आहे. व्यावसायिक वाहनांना १५ वर्षांनंतर तर खासगी वाहनांसाठी २० वर्षांनंतर मोडित काढता येईल. म्हणजेच वीस वर्षांपेक्षा अधिक जुने वाहन तुम्हाला रद्दीप्रमाणे भंगारात विकावे लागणार आहे. दिलेल्या मुदतीत वाहनमालकांना ऑटोमेटेड फिटनेस सेंटरवर न्यावे लागणार आहे. या धोरणामुळे वाहन मालकांचे आर्थिक नुकसान कमी होऊन त्यांचे संरक्षणही होणार आहे, असा दावा सरकारने केला आहे. रस्ता अपघातांची संख्या कमी होण्यास मदत होणार आहे.