विशेष प्रतिनिधी, मुंबई
विमा क्षेत्राचे नियामक इरडा (Irdai) ने पॉलिसी अॅग्रीगेटर पॉलिसी बझार (policy bazaar) वर तबब्ल २४ लाख रुपयांचा दंड ठोकला आहे. जाहिरातींशी संबंधित नियमांचे उल्लंघन केल्याच्या आरोपात इरडाने पॉलिसी बाजारवर हा दंड ठोठावला आहे.
पॉलिसी बाजारने गेल्यावर्षी ग्राहकांना टर्म इन्शुरन्स पॉलिसीच्या प्रिमीयममध्ये वाढ झाल्याचा एसएमएस पाठविला होता. इरडाने हा एसएमएस चुकीचा आणि संभ्रम निर्माण करणारा आहे, असे सांगत कारवाई केली आहे.
पॉलिसी बाजारने १५ मार्च २०२० ते ७ एप्रिल २०२० या कालावधीत ग्राहकांना एसएमएस पाठविले होते. त्यात कंपनीने आपले रजिस्टर्ड नावही पूर्णपणे लिहीलेले नव्हते. जवळपास १० लाख ग्राहकांना हा एसएमएस पाठविण्यात आला होता. जीवन विम्याचे दर १ एप्रिलपासून वाढणार आहे आणि ते टर्म प्लान खरेदी करून १.६५ लाख रुपये वाचवू शकतात, असा मजकूर या मेसेजमध्ये होता.
भारतीय विमा नियामक व विकास प्राधिकरणाने (इरडा) पॉलिसी बाजारवर तीन आरोप निश्चित केले आहेत. त्यात चुकीचा मेसेज पाठविणे आणि जाहिरातींच्या नियमांचे उल्लंघन करणे या दोन गंभीर गुन्ह्यांचा समावेश आहे. इरडाने ७ एप्रिल २०२० ला पॉलिसी बाजारला स्पष्टीकरण मागितले होते.
इरडाने मेसेज तातडीने रोखण्याचे आणि जाहिरातींच्या माध्यमातून त्याची दिलगिरी व्यक्त करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर पॉलिसी बाजारकडून वेगवेगळ्या सुनावण्यांमध्ये स्पष्टीकरण देण्यात आले. त्यात प्रमुख विमा कंपन्यांनी आम्हाला दिलेल्या माहितीच्या आधारावरच ग्राहकांना संदेश पाठविल्याचे त्यांनी सांगितले.
एचडीएफसी लाईफ, टाटा लाईफ आणि आयसीआयसीआय प्रुडेंशियल यांच्याकडून टर्म इंशुरन्सचा प्रिमीयम वाढणार असल्याचे आम्हाला सांगण्याच आले, असे पॉलिसी बाजारने स्पष्ट केले आहे. मेसेजमध्ये कंपनीचे नाव का नव्हते, या प्रश्नावर मोजक्या अक्षरांची मर्यादा असल्यामुळे ”POLBAZ” असे नाव देण्यात आले होते, असे कंपनीने म्हटले आहे.