नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राजस्थान येथे फरार आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या आडगांव पोलीस ठाण्याच्या पथकाच्या वाहनाचा सुरत येथे अपघात झाला. या वाहनात पकडलेला आरोपी सुध्दा होता. या अपघातात उपनिरीक्षक अशोक पाथरे आणि महिला पोलीस नाईक प्रेरणा अंबादे हे गंभीर जखमी झाले. तर संशयित आणि इत्तर कर्मचाऱ्यांना किरकोळ स्वरूपाच्या इजा झाली. या अपघातानंतर स्थानिकांनी जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यानंतर या जखमींवर उपचार करून त्यांना नाशिकला आणून त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले आहे .
गुरुवार १५ सप्टेंबर रोजी पहाटे साडेसहा वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. या पथकाच्या इनोव्हाकारच्या चालकाला पाऊस सुरु असल्याने रस्त्यावर उभा असलेला ट्रक दिसला नाही. त्यामुळे हा अपघात झाला. अल्पवयीन मुलीला पळवून नेत तिच्यावर अत्याचार केल्याच्या गुन्ह्यातील आरोपी अजय पांडुरंग आडके ४५ याला पकडण्यासाठी आडगाव पोलिसांचे हे पथक राजस्थानमध्ये १२ सप्टेंबर रोजी रवाना झाले होते. या पथकात उपनिरीक्षक अशोक पाथरे, महिला पोलीस नाईक प्रेरणा अंबादे, पोलीस नाईक अरुण जाधव, सुनील बाविस्कर हे होते. या पथकाने राजस्थानमधील उदयपूर आणि आजूबाजूच्या परिसरात संशयितांचा शोध घेत त्याला ताब्यात घेतले. त्यानतंर हे पथक नाशिककडे येत असतांना त्यांच्या वाहनाचा सुरत येथे अपघात झाला.