इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – मारहाणीचा आरोप असलेल्या एका मुख्याध्यापकाला अटक करण्यासाठी पोहोचलेल्या पोलिसांवर ग्रामस्थांनी हल्ला केला. बिहारमधील मुजफ्फरपूर जवळील बरुराज पोलिस ठाणे क्षेत्रातील चौरघट्टा गावात शनिवारी ही घटना घडली आहे. ग्रामस्थांनी सर्व पोलिसांना तब्बल एक तास ओलिस ठेवले. अटक केलेल्या दोन आरोपींची ग्रामस्थांनी सुटका केली. घटनास्थळावरून देशी आणि परदेशी दारू जप्त करण्यात आली आहे. या हल्ल्यात पोलीस निरीक्षक राज कुमार यांच्यासह सहा पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. सर्वांवर प्राथमिक आरोग्य केंद्रात रात्री उशिरा उपचार करण्यात आले.
पोलीस उपाधीक्षक अभिषेक आनंद यांनी या घटनेची माहिती देताना सांगितले की, चौरघट्टा येथील मुख्याध्यापक युगल किशोर साहनी यांच्यावर निवडणुकीच्यादरम्यान मारहाण केल्याचा आरोप आहे. त्यांच्या घरावर छापेमारी करण्यात आली. पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतले होते. घटनास्थळावरून दारूही जप्त करण्यात आली. यादरम्यान अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या समर्थकांनी पोलीसपथकला ओलिस ठेवले. ग्रामस्थांनी हल्ला करून दोन आरोपींची सुटका केली. ग्रामस्थांनी सुमारे तासभर पोलिसांना ओलिस ठेवले होते. पोलिसांवर झालेल्या हल्ल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींची ओळख पटवली जात आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षकांनी दिली.