आग्रा (उत्तर प्रदेश) – येथील जगदिशपुरा पोलिस ठाण्याचे गोदाम फोडून चोरट्यांनी तब्बल २५ लाख रुपये लंपास केले आहेत. रविवारी सकाळी पोलिस निरीक्षक ठाण्यात आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. चोरट्यांनी सर्वप्रथम गोदामाच्या मागील गेटजवळील खिडकी उघडण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यात अपयश आल्याने त्यांनी दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. तेथील पेट्यांचे कुलूप तोडून रोख रक्कम लंपास केली. गोदाम फोडताना किती चोर सहभागी होते याबाबत पोलिसांना माहिती मिळालेली नाही. तसेच चोरटे कोणत्या रस्त्याने आले आणि गेले याबाबतही पोलिसांना काहीच कळाले नाही. त्यामुळे हा सर्व प्रकार घडत असताना पोलिस झोपले होते का, असा सवाल आता उपस्थित होत आहे.
जगदिशपुरा पोलिस ठाण्याला दोन दरवाजे आहेत. एक दरवाजा बोदला-लोहामंडी मार्गावर आहे. हा दरवाजा बंद असतो. त्याच्या आजूबाजूला दुकाने आहेत. दरवाज्याच्या आत ठाणे परिसरात वाहने उभी आहेत. पोलिस ठाण्याचे मुख्य कार्यालय २५ ते ३० मीटर आत आहे. तेथेसुद्धा गोदाम आहे. तिथे खिडकी आणि दरवाजा आहे. दुसरा दरवाजा रोडवेज कॉलनीकडे जाणार्या मार्गावर आहे. त्यातूनच पोलिस कर्मचारी आणि नागरिकांची ये-जा सुरू असते. मुख्य दरवाजातून आत गेल्यावर कार्यालयाच्या दरवाजावर सीसीटीव्ही कॅमेरा लावलेला आहे.
गोदामाजवळ कार्यालय आहे, तर समोर तुरुंग आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, तुरुंगात बाहेर जाळी लावलेल्या ठिकाणी तीन आरोपींना ठेवण्यात आले होते. गोदामात घुसलेल्या चोरट्याने मागचा दरवाजाच्या खिडकी आणि दरवाजाचे कुलूप तोडले होते. त्यानंतर पेट्यांचे कुलूप तोडले. त्यादरम्यान आवाजही झाला परंतु पोलिसांना हा आवाज आलाच नाही. त्यामुळे ड्युटीवर तैनात पोलिस कर्मचारी ठाणे परिसरात झोपले होते, अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे.
चोरटे गोदामाच्या मागच्या दरवाजातून आत आले असावेत. या दरवाजातून बोदला रोडकडे जाऊ शकता येते. जवळपास झाडे-झुडूपेही आहेत. रोख रक्कम असलेल्याच पेटीचे कुलूप तोडण्यात आले. गोदामात मौल्यवान दागिन्यांसग दारू-गोळा, कागदपत्रे ठेवले जातात. या वस्तूंना चोरट्यांनी हातच लावला नाही. याचाच अर्थ असा निघतो की चोरटा माहितगार होता. त्याने आधीच रेकी केली असेल. गोदामात २४-२५ लाखांची रोख रक्कम आहे हेसुद्धा त्याला ठाऊक असेल.
पोलिस कर्मचार्यांचाही हात?
गोदामात काय ठेवले आहे हे फक्त पोलिस कर्मचार्यांना ठाऊक असते. त्यांच्याशिवाय गोदामात इतर कोणालाही प्रवेश नसतो. जे लोक चोरी झालेल्या वस्तू घेऊन जाण्यासाठी येतात ते सुद्धा येतात. या चोरीत एखाद्या पोलिस कर्मचार्याचा हात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. यामध्ये कोणताही पोलिस कर्मचारी संशियत आढळल्यास त्याच्याविरुद्ध कारवाई होईल, असे पोलिस अधिकारी जी. मुनिराज यांनी सांगितले.