इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
राज्य सरकारने पोलीस भरतीची २०२२ पासून २०२५ पर्यंत संबंधित पदाची विहित वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना आता आणखी संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. आता अशा उमेदवारांना विशेष बाब म्हणून या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करता येणार आहे. गृह विभागाने १० सप्टेंबर २०२५ रोजी याबाबतचा शासन निर्णय जारी केला आहे. शेकडो तरुणांना या निर्णयाचा फायदा होणार आहे.
आधी कोरोना आणि नंतर इतर काही कारणांमुळे पोलीस भरती रखडली होती. त्यामुळे वयोमर्यादा ओलांडलेले विद्यार्थी आणि विविध संघटनांनी वयोमर्यादा वाढवण्याची मागणी केली होती. त्यानंतर आता सरकारने अशा उमेदवारांना आणखी एक संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने नुकतेच पोलीस दलातील १५ हजार ६३१ पदभरतीचा शासन निर्णय जारी केला आहे. या निर्णयाअंतर्गत आता जानेवारी २०२४ पासूनची रिक्त पदं भरली जाणार आहेत. यात आता वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांनाही अर्ज करता येणार आहे.
पोलीस शिपाई पदासाठी १२ हजार ३९९ जागांची भरती होणार आहे. तर पोलीस शिपाई चालक पदाच्या एकूण २३४ जागा भरल्या जाणार आहेत. बॅण्ड्समन पदाच्या एकूण २५ जागा भरल्या जाणार आहेत. तर सशस्त्र पोलीस शिपाई पदाच्या एकूण २ हजार ३९३ जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. कारागृह शिपाई ५८० पदे अशी १५ हजार ६३१ पदे भरली जाणार आहेत.
