नाशिक -आजारांच्या लाटा येतील जातील, पण श्वास हा निरंतर सुरू असला पाहिजे हे महत्वाचे आहे,म्हणूनच लाट ओसरत असली तरी काळजी घेणं ओसरायला नको इतकीच माफक अपेक्षा व्यक्त करतो असे सांगत पोलीस अधिक्षक सचिन पाटील यांनी सोशल मीडियात मेसेज पोस्ट करुन भावविक साद जनतेला घातली आहे.
या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे की, गत वर्षापासून कोरोनाचा हाहाकार सुरू असताना दुसरी लाट आता ओसरायला लागल्याने सोमवार पासून वेळेत वाढ होत पुन्हा बाजारला सुरूवात होत आहे. तसा विचार केला तर कालचक्र खूप मोठं आहे. परंतु दुसऱ्या लाटेच्या वेळी याची इजा तीव्र होती, कारण येथे माणसाच्या जिवावर बेतण्याच प्रमाण मोठं होत. अनेक घरातील माणसं या लाटेत इहलोकी गेली. आपल्याला मोठी किंमत मोजावी लागली. आता वर्षा ऋतू सुरू झालाय,खरेतर तळपत्या वातावरणात मागच्या पन्नास दिवसांत धडपडणाऱ्या प्रत्येकाने या ओसारत्या लाटेला काळजीचे कोंदण देण्याची वेळ आली आहे. कायदा-सुव्यवस्था बघत असताना ज्यावेळी कडक बंधनं होती त्यावेळी आपण सर्वच काळजी घेत होतो. यात गस्तीवर तैनात पोलिसांना आपणा सर्वांचे मोठे सहकार्य लाभले.
आता तिसरी लाट डोके वर काढण्याच्या प्रयत्नात आहे. त्यात म्युकरमायकोसिस सारख्या गंभीर आजाराने फोडणी दिल्याने तो चिंतेचा विषय ठरू पाहतोय. मागच्या पन्नास दिवसात बेड,ऑक्सिजन,रेमडिसिव्हर हे त्रिकुट जेव्हा अधिराज्य गाजवत होते तेव्हा काळ सोकावतो की काय अशी भावना प्रत्येकाच्या मनात येणं स्वाभाविक होत. परंतु नशिबाने थट्टा न केल्यानेच आज मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या आटोक्यात आल्याचे समाधान आपणा सर्वांनाच वाटने साहजिक आहे. आता हळूहळू शासनाने निर्बंधात शिथिलता आणायला सुरुवात केली आहे. पण गेल्या काही दिवसांपासून अनेक ठिकाणी होणारी गर्दी आणि त्यातून पुन्हा कोरोना उद्भवण्याचे प्रमाण वाढल्यास याला जबाबदार कोण हा मुख्य प्रश्न आहे. नियमांचा फज्जा उडवला तर तो आयुष्यावर बेतू शकतो. सार्वजनिक आयुष्यात जगताना लॉकडाऊन हा पर्याय नाही हे सर्वमान्य असले तरी ते लावणे आपल्याच हिताचे होते हे निर्भेळ सत्य आता कुणीही नाकारू शकत नाही. खरंतर अनलॉक करणं सुरू झालंय. जेथे काही निर्बंध आहेत तेथे परिस्थिती बघून प्रशासनाकडून ते ही शिथिल केले जातील. माझी आपणास विनंती असेल की काळजी घेऊन ती सतत पाळणे आपले आद्य कर्तव्य आहे. आजारांच्या लाटा येतील जातील , पण श्वास हा निरंतर सुरू असला पाहिजे हे महत्वाचे आहे,म्हणूनच लाट ओसरत असली तरी काळजी घेणं ओसरायला नको इतकीच माफक अपेक्षा व्यक्त करतो असे आवाहन त्यांनी केले आहे.