मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुक्ताईनगर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांची दुसऱ्या जिल्ह्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून १५ दिवसांच्या आत चौकशी करण्यात येणार असून दरम्यानच्या काळात त्या पोलीस निरीक्षकाची तातडीने बदली करण्यात येईल, असे गृहराज्यमंत्री (ग्रामीण) शंभूराज देसाई यांनी विधानसभेत सांगितले.
सदस्य चंद्रकांत निंबा पाटील यांनी विचारलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना गृहराज्यमंत्री श्री. देसाई यांनी सांगितले की, मुक्ताईनगरमध्ये दारुबंदी आणि जुगाराच्या गुन्ह्यांमध्ये पोलिसांनी कारवाई केली आहे. २०२० मध्ये दारुबंदीचे ८४ तर २०२१ मध्ये १०५ गुन्हे दाखल असून २०२० मध्ये जुगाराचे २५ तर २०२१ मध्ये ३६ गुन्हे दाखल केले आहेत. हलखंडा येथील दरोड्याच्या गुन्ह्यात ९ पैकी ६ आरोपी अटकेत असून इतरांचा शोध सुरु असल्याचे सांगून २०२१ मध्ये मुक्ताईनगर हद्दीत तडीपाराचा एक प्रस्ताव होता असे गृहराज्यमंत्री श्री. देसाई यांनी सांगितले. मुक्ताईनगर पोलीस निरीक्षकाची उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडून चौकशी करण्यात आली आहे, त्यात दोषी आढळले नाही मात्र आता या पोलीस निरीक्षकाची शेजारील जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्याकडून चौकशी करण्यात येणार असल्याचे गृहराज्यमंत्री श्री. देसाई यांनी सांगितले.