विजय वाघमारे, जळगाव
बीएचआर घोटाळ्यातील मुख्य संशयित सुनील झंवरने आपल्या जुन्या मोबाईलमध्ये अवघ्या तासाभरासाठी नवीन सीम कार्ड टाकले आणि हीच चूक त्याच्या अटकेसाठी कारणीभूत ठरली. विशेष म्हणजे पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने मागील १० दिवसात झंवरचे १५०० पेक्षा जास्त वेळा वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकाचे लोकेशन शोधून काढले. एवढेच नव्हे तर इंदोर ते नाशिक असा ४३० किमी सिनेस्टाईल पाठलाग करून झंवरला अखेर नाशकात अटक केलीच.
पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने अखेर सापळा रचून नाशिक येथून अटक केली आहे. दरम्यान, तत्पूर्वी पोलिसांचे पथक दहा दिवसापासून झंवरच्या मागावर होते. त्यानंतर रात्रभर पद्धतशीरपणे सापळा रचल्यानंतर आज सकाळी १०:३० वाजता पंचवटी परिसरातून त्याला अटक करण्यात आली. बीएचआर घोटाळ्यातील मुख्य संशयित आरोपी सुनील झंवर हा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होता.
बापरे एवढ्या मोबाईलचे लोकेशन शोधले
मागील काही १० दिवसापासून पोलिसांना झंवरचा सुगावा लागलेला होता. झंवर फरार असल्यापासून सतत मोबाईल आणि सीम कार्ड बदलत होता. तसेच तो जास्तीत जास्त डोंगलचा वापर करुन बोलत होता. त्यामुळे पोलिसांना त्याचा माग काढणे कठीण जात होते. अशा परिस्थितीत कोणताही धागेदोरे नसताना झंवरला शोधण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेचे पथक प्रयत्न करत होते. पोलिसांनी मागील १० दिवसात १५०० पेक्षा जास्त वेळा वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकाचे लोकेशन काढून त्यातील जास्तीत जास्त लोकेशन्सला भेट देऊन झंवरचे वास्तव्याचे ठिकाणी झाडाझडती घेतली. तसेच पोलिसांनी ५० हुन अधिक आयएमइआय (IMEI) चेक केले तसेच ५० हुन अधिक मोबाईल क्रमांकचे सिडीआर, एसडीआर चेक केले.
१० दिवसात २५०० किमीपेक्षा जास्त प्रवास
पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने झंवरला शोधण्याकरिता १० दिवसात २५०० किमी पेक्षा जास्त प्रवास केला. १० दिवस वेगवेगळ्या ठिकाणी हॉटेलमध्ये राहून वाहन व आम्ही स्वतःची ओळख लपवून तपास केला. विशेष म्हणजे इंदोर ते नाशिक असा ४३० किमी पाठलाग करून शोध घेत-घेत झंवरला ताब्यात घेतले. इंदोरहून निघाल्यानंतर झंवर वापरत असलेल्या डोंगलचे लोकेशन धुळ्याच्या दिशेने जात असल्याचे पोलिसांना कळले. त्यानंतर रात्री साधारण २ ते ३ वाजेच्या दरम्यान, झंवर पंचवटी परिसरातील एका उच्चभ्रू वस्तीत शिरला. पोलिसांनी रात्री परिसर पिंजून काढायला सुरुवात केली. या परिसरात सकाळी पोलिसांना एक संशयास्पद कार आढळून आली. पोलिसांनी लागलीच कारची माहिती काढली असता ती कार सुनील झंवरचा मुलगा सुरज झंवर वापरत असल्याचे लक्षात आले.
अखेर झंवर गोत्यात
झंवर वापरत असलेल्या कार जवळ पोलिसांनी गस्त घालायला सुरुवात केली. सकाळी ८ वाजेच्या सुमारास सुनील झंवरचा ड्रायव्हर कारमधून एक बॅग काढायला आला. त्यानंतर पोलिस ड्रायव्हरच्या मागेच राहिले. त्यामुळे सकाळी ८ वाजेनंतर झंवर खऱ्या अर्थाने गोत्यात आला. साधारण १०:३० वाजेच्या सुमारास सुनील झंवर आपल्या नातेवाईकच्या घरातून बाहेर पडला. विशेष म्हणजे झंवर पुन्हा कार बदलवून वेगळ्या ठिकाणी फरार होण्याच्या तयारीत होता. परंतू तत्पूर्वीच पोलिसांनी त्याला घेरत ताब्यात घेतले.
अहमदाबाद, उज्जेनमधून निसटला नाशकात मात्र अडकला
सुनील झंवरने जुन्या मोबाईलमध्ये नवीन सीमकार्ड टाकल्यानंतर तो पोलिसांच्या रडारवर आला होता. परंतु तेव्हा पासून तो सतत राहण्याचे ठिकाण,मोबाईल, कार बदलवत होता. सुरुवातीला अहमदाबाद नंतर झंवर उज्जेन पोहचला. इंदोरला तो एका उच्चभ्रू परिसरात वास्तव्यास थांबला. परंतु एवढ्या मोठ्या परिसरातून त्याला शोधणे कठीण होते. त्यानंतर मात्र, पोलिसांनी इंदोर पासून डोंगलच्या लोकेशनवरून झंवरचा पाठलाग करायला सुरुवात केली. साधारण ४३० किलो मीटरचा प्रवास केल्यानंतर काल रात्री झंवर नाशिक येथे पोहचला आणि पोलिसांच्या सापळ्यात अडकला.
ते घर झंवरच्या मामाचे
सुनील झंवर पंचवटी परिसरात कुणाच्या घरात राहत होता. याची चर्चा सकाळपासूनच सुरु होती. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार ते घर सुनील झंवरच्या इंदानी नामक मामाचे आहे. परंतू झंवरला घराच्या बाहेर पडल्यानंतर कारमधून पळून जाण्याच्या तयारीत होता.